खान्देश गारठला! जळगावचा पारा ८ अंशांवर, धुळ्यात ६.३ अंश; तोरणमाळ मात्र उबदार
जळगाव । नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात खान्देशात थंडीचा जोर अचानक वाढला असून जळगाव आणि धुळे जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली आहे. धुळे शहरात यंदाच्या हिवाळ्यातील आतापर्यंतचे नीचांकी ६.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. दुसरीकडे जळगाव शहरातील तापमानही थेट ८ अंशांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे.
जळगावात एका दिवसात पारा ४.४ अंशांनी घसरला
जळगाव शहरात थंडीचा प्रभाव अचानक वाढल्याचे चित्र आहे. शुक्रवारी शहराचे किमान तापमान ८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. विशेष म्हणजे, आदल्या दिवशी किमान तापमान १२.६ अंश होते. अवघ्या २४ तासांत तापमानात तब्बल ४.४ अंशांची घसरण झाल्याने यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली.

रात्रीच्या वेळी ताशी १५ ते २० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गारठा आणखी वाढत आहे. पहाटे कामानिमित्त घराबाहेर पडणारे नागरिक तसेच रात्री प्रवास करणाऱ्यांना थंडीचा चांगलाच सामना करावा लागत आहे. पुढील दोन दिवसही थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने जळगावकरांच्या हुडहुडीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
धुळ्यात पारा ६.३ अंशांवर
जळगावसोबतच धुळे शहरातही थंडीने जोरदार हजेरी लावली आहे. कृषी केंद्रातील वेधशाळेच्या नोंदीनुसार शनिवारी सकाळी धुळ्याचे किमान तापमान ६.३ अंश सेल्सिअस होते. यापूर्वी शहरातील तापमान १० अंशांपर्यंत खाली आले होते. मात्र, आता त्यात आणखी मोठी घट झाल्याने यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.


तापमानातील या घसरणीचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. मात्र, वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांनी सकाळी आणि रात्री विशेष काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.
तोरणमाळमध्ये मात्र थंडीचा जोर कमी
खान्देशातील मैदानी भागात थंडीचा कडाका वाढला असताना प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळमध्ये मात्र अपेक्षित गारठा अद्याप जाणवत नाही. नोव्हेंबरचा निम्म्याहून अधिक काळ उलटूनही तापमानात मोठी घट झालेली नाही.
शुक्रवारी तोरणमाळचे किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. दिवसभर उन्हाचा चटका जाणवत असून सकाळ आणि रात्रीच्या वेळीच काही प्रमाणात थंडी जाणवत आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या मध्यात तोरणमाळचे तापमान १० ते ११ अंशांच्या आसपास होते. डिसेंबरमध्ये तर पहाटेच्या वेळी दवबिंदू गोठण्याइतकी थंडी जाणवत होती. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी असून पर्यटकांना तोरणमाळमध्ये कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.