जळगावमध्ये थंडीचा जोर वाढणार! तापमान ११ अंशांपर्यंत घसरण्याचा अंदाज

0

जळगाव । जळगाव शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढत असून, आता तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. सोमवारी शहराचे किमान तापमान १२.७ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. यंदाच्या हिवाळी हंगामातील हे आतापर्यंतचे नीचांकी तापमान ठरले आहे. त्यातच येत्या १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान किमान तापमान ११ अंशांपर्यंत खाली येण्याचा अंदाज असल्याने जळगावकरांना हुडहुडी भरण्याची शक्यता आहे.

गतवर्षी १६ नोव्हेंबर रोजी जळगावचे किमान तापमान ८.७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. यंदा मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत तापमान सुमारे ४ अंशांनी अधिक आहे. तरीही हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने शहरात थंडीचा प्रभाव वाढल्याचे दिसून येत आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी गारठा अधिक जाणवत असल्याने नागरिक उबदार कपड्यांचा आधार घेत आहेत.

पुढील तीन दिवसांत तापमान ११ अंशांवर घसरणार?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान जळगाव जिल्ह्यात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. या काळात दिवसाचे कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. मात्र, रात्रीच्या तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विशेषतः १८ ते २० नोव्हेंबर या तीन दिवसांत किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. त्यामुळे पहाटेचा गारठा अधिक वाढणार असून, सकाळी घराबाहेर पडणाऱ्यांना थंडीचा सामना करावा लागू शकतो.

दिवसा ऊन, रात्री थंडीचा जोर!

जळगावमध्ये सध्या दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री बोचऱ्या थंडीचा अनुभव येत आहे. कमाल तापमान ३० ते ३२ अंशांच्या आसपास राहणार असले, तरी रात्रीच्या तापमानातील घसरणीमुळे दिवस आणि रात्रीच्या हवामानात मोठी तफावत जाणवणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस जळगावकरांसाठी थंडीचे ठरणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.