जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची विजयी सुरुवात! भाजपची एक, शिंदेसेनेच्या दोन जागा बिनविरोध
जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने खाते उघडले असून तीन जागांवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ही महत्त्वपूर्ण घडामोड घडली. यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या दोन, तर भाजपच्या एका जागेचा समावेश आहे. विशेष म्हणजे, तिन्ही मतदारसंघांत राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील महिलांची संचालकपदी वर्णी लागणार आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत होती. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पारोळा, एरंडोल आणि भुसावळ या तीन सोसायटी मतदारसंघांतील उमेदवारांविरोधात प्रतिस्पर्धी अर्ज नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या तिन्ही जागांवरील बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.


पारोळा, एरंडोलमध्ये अमोल पाटील यांच्या कुटुंबातील महिलांची वर्णी
पारोळा सोसायटी मतदारसंघातून नलिनी चिमणराव पाटील, तर एरंडोल सोसायटी मतदारसंघातून मृणाल अमोल पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. नलिनी पाटील या माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या पत्नी आणि आमदार अमोल पाटील यांच्या मातोश्री आहेत. तर मृणाल पाटील या आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी आहेत.
त्यामुळे जिल्हा बँकेत माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या जागी त्यांच्या पत्नी, तर आमदार अमोल पाटील यांच्या जागी त्यांच्या पत्नी संचालक म्हणून जबाबदारी सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नीही बिनविरोध
दुसरीकडे, भुसावळ सोसायटी मतदारसंघातून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनीताई संजय सावकारे यांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात मंत्री सावकारे यांच्या पत्नी प्रतिनिधित्व करणार आहेत.
या तीन जागांवरील बिनविरोध निवडीमुळे महायुतीने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुरुवात केली आहे. आता उर्वरित जागांसाठी उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी आणि त्यानंतर अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्तेच्या समीकरणांकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.