जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण
जळगावच्या सुवर्ण बजारात सोने आणि चांदीच्या दरातील घसरण गुरुवारीही कायम राहिली. बुधवारी सोन्याच्या दरात वाढ झाली होती. मात्र, गुरुवारी पुन्हा दरात घसरण नोंदवण्यात आली. चांदीच्या दरात प्रतिकिलो दोन हजारांची घट झाली असून, सोनेही प्रतिदहा ग्रॅम 200 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सुवर्ण बाजारात मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. मधल्या काळात दरात काहीशी वाढ होत असली तरी एकूणच घसरणीचे चित्र पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सोने-चांदीच्या दरांवर होत असल्याचे दिसून येत आहे. या आठवड्यात सोन्याचे दर सरासरी स्थिर राहिले असले, तरी चांदीच्या दरात सरासरी पाच हजार रुपयांचे घसरण झाली आहे. बुधवारी २८ ऑक्टोबरला सोन्याच्या दरात प्रतिदहा ग्रॅम १,२०० रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सोन्याचा दर जीएसटीविना एक लाख ४३ हजार रुपये झाला होता.


मात्र, गुरुवारी २९ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात २०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅम एक लाख ४२ हजार ८०० रुपयांवर आला आहे. चांदीच्या दरातही घसरण कायम आहे. बुधवारी चांदीचा दर प्रतिकिलो एक लाख ९८ हजार रुपये होता. गुरुवारी त्यात दोन हजार रुपयांची घट होऊन चांदीचा दर प्रतिकिलो एक लाख ९६ हजार रुपयांवर आला आहे. हे दर जीएसटीविना आहेत. सोने आणि चांदीच्या दरातील या घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळत असला, तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे आगामी काळात दरांमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे.