सरकारला जरांगे पाटलांचा थेट अल्टिमेटम; ‘१० मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडणार!
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी उपचारांसह पाणी घेण्यासही नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान, सरकारकडून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.

सरकारने वेळेत निर्णय घेतला असता तर उपोषणाची वेळच आली नसती, असा दावा त्यांनी केला. 29 जून रोजीच सरकारला आंदोलनाची परिस्थिती निर्माण होऊ नये, असा इशारा दिला होता. मात्र, त्यानंतरही तीन महिन्यांच्या कालावधीत ठोस निर्णय झाला नसल्याचे जरांगे यांनी म्हटले.


‘मराठा समाजाला संपवण्याचा प्रयत्न’ असल्याचा आरोप
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून सुरू असलेल्या दिरंगाईमागे मराठा समाजाबद्दलचा आकस असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. या भूमिकेमुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला असून सरकारने परिस्थिती गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलन दडपण्यासाठी कट रचल्याचा दावा
आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्ताधारी मंत्र्यांची बैठक झाल्याचा दावा करत या बैठकीत मराठा आंदोलन कसे रोखता येईल, याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर आंदोलकांवर पोलिसांमार्फत कारवाई घडवून आणण्याचा कट असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. अशा प्रकारची कारवाई झाल्यास त्याची राजकीय जबाबदारी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर येईल, असेही जरांगे यांनी म्हटले. या कटामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संबंधित काही व्यक्ती सहभागी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
‘आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न होऊ शकतो’
मराठा आंदोलन बदनाम करण्यासाठी त्याला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असा दावा जरांगे पाटील यांनी केला. आंदोलकांनी पोलिसांशी संघर्ष न करता शांततेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबईकडे जाताना पोलिसांकडून अडथळे निर्माण झाले तरी आंदोलकांनी संयम राखावा आणि कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा समाजाचा आवाज बंद करणे हा सत्ताधाऱ्यांचा छुपा अजेंडा आहे. जर मुंबईला जाताना आपल्या बांधवांना अडवलं किंवा त्यांना मारहाण झाली तर 10 मिनिटात महाराष्ट्र बंद पाडा.