MPSC पेपरफुटी प्रकरण! रोहिणी खडसे संतापल्या

0

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरुन (MPSC paper leak) राज्यातील वातावरण चांगलच गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी विद्यार्थी आंदोलन करताना दिसत आहे. तर विरोधक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक होताना दिसत आहेत. अशातच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. सरकाराला जनाची नाही मनाची तरी असेल तर त्यांनी या मोर्चाकडे दुर्लक्ष न करता तातडीने हालचाली कराव्यात असा इशारा त्यांनी दिला आहे.

पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी काढलेला ‘आक्रोश मोर्चा’ हा सरकारच्या अपयशाचा पुरावा
खडसे यांनी सोशल मीडियावरून ही प्रतिक्रिया दिली आहे. MPSC परीक्षांमधील पेपरफुटी आणि भोंगळ कारभाराविरोधात पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी काढलेला ‘आक्रोश मोर्चा’ हा सरकारच्या अपयशाचा ढळढळीत पुरावा आहे. या मोर्चातील मुलं ही शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची मुलं आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी काहींच्या वडिलांनी जमीन विकली आहे तर काहींच्या वडिलांनी इतकं कर्ज काढले आहे की आयुष्यभर कष्ट केले तरी फेडू शकणार नाही. पेपर फोडणाऱ्यांनी त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली आहे अशी नाराजी खडसेंनी व्यक्त केली.

लाखो तरुण-तरुणींच्या भवितव्याशी खेळणाऱ्या MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांनी तात्काळ राजीनामा घ्यावा
माय बाप सरकाराला जनाची नाही मनाची तरी असेल तर त्यांनी या मोर्चाकडे दुर्लक्ष न करता तातडीने हालचाली कराव्यात अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली. लाखो तरुण-तरुणींच्या भवितव्याशी खेळणाऱ्या MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांनी तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

MPSC परीक्षेच्या पेपरफुटीवरुन कारवाईला वेग
राज्यभरात गाजलेल्या MPSC परीक्षेच्या (MPSC) पेपरफुटीवरुन आता कारवाईला वेग आला आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एमपीएससी (MPSC Paper Leak Case) औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी नंदुरबार येथून ऋतुजा पाटीलला देखील अटक करण्यात आली होती. पोलिसांनी नंदुरबारमध्ये (Nandurbar) ऋतुजाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर तिला अटक करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. 270 पानांच्या व्हॉट्सॲपवरील (WhatsApp) चॅट्समधून तपासाला नवी दिशा प्राप्त झाली आहे. MPSC ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटी प्रकरणात आरोपी ऋतुजा पाटीलचा मोबाईल उल्हास नदीत फेकल्याचा दावा करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.