51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन

0

जळगाव शहरातील प्रसिद्ध ‘सुभाष चौक मित्र मंडळा’च्या दहीहंडी उत्सवात बक्षीसाच्या रकमेवरून मोठा वाद उफाळून आला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये जाहीर केलेल्या मोठ्या रकमेचे बक्षीस देण्यास आयोजकांनी ऐनवेळी स्पष्ट नकार दिला. आयोजकांच्या या फसवणुकीच्या आणि मनमानी कारभाराच्या निषेधार्थ दहीहंडीचे थर लावणाऱ्या ‘गोपाळ पेठ मंडळा’च्या संतप्त गोविंदांनी थेट दहीहंडीच्या खालीच ठाण मांडत जोरदार ‘रस्ता रोको’ आंदोलन केले. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील सुभाष चौक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात दहीहंडीचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील हंडी फोडणाऱ्या आणि उच्च थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी मोठमोठ्या बक्षीसांची घोषणा प्रसारमाध्यमांतून आणि वृत्तपत्रांमधून करण्यात आली होती.

याच बातमीच्या आधारावर जळगावच्या गोपाल पेठ मंडळाच्या गोविंदांनी जीवाची पर्वा न करता तब्बल 7 थर लावून दहीहंडीला यशस्वी सलामी दिली. प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार आपल्याला 51 हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळणे अपेक्षित होते. मात्र, सलामी दिल्यानंतर सुभाष चौक मंडळाने 51 हजार देण्यास नकार देत गोविंदांच्या हातात केवळ 5,100 रुपये टेकवण्याचा प्रयत्न केला.

आयोजकांच्या या वागण्यामुळे अत्यंत संतप्त झालेल्या गोपाळ पेठ मंडळाच्या गोविंदांनी तीव्र शब्दांत आपला संताप व्यक्त केला. “आम्ही गेल्या महिन्याभरापासून सातत्याने थर लावण्याचा सराव करत आहोत. अनेक गोविंदा जखमी झाले, जीवावर उदार होऊन आम्ही 7 थर लावून सलामी दिली. पण आयोजक मात्र नाममात्र पैसे देऊन आमची दिशाभूल करत आहेत,” असा आरोप गोविंदांनी केला.

आमच्यावर झालेला हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. भविष्यात कोणत्याही गोविंदा पथकाची अशा प्रकारे फसवणूक होऊ नये, यासाठीच आम्ही हे आंदोलन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.