लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! १ कोटी ६५ लाख महिलांना नियमित पैसे मिळणार; फडणवीसांचा मोठा खुलासा

0

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील अपात्र लाभार्थ्यांबाबत सुरू असलेल्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. नियमाबाहेर कोणालाही एकही रुपया दिला जाणार नाही, तर योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्व महिलांना नियमितपणे लाभ मिळत राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्यात सध्या १ कोटी ६५ लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्याची माहिती त्यांनी दिली.

योजनेतील काही लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आल्याच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, योजनेचे निश्चित नियम आणि निकष आहेत. योजना सुरू करताना महिलांना त्रास होऊ नये, यासाठी तातडीने कठोर तपासणी करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यानंतर पुनर्तपासणी करण्यात आली तसेच ई-केवायसी प्रक्रिया राबवण्यात आली.

ई-केवायसी न करणाऱ्यांना योजनेतून वगळले

नियमाबाहेर लाभ घेतलेल्या आणि वारंवार संधी देऊनही ई-केवायसी पूर्ण न केलेल्या लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. तपासणीदरम्यान अनेक महिला आयकर भरणाऱ्या कुटुंबातील असल्याचे समोर आले. नियमानुसार अशा महिला योजनेसाठी पात्र ठरत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काही पुरुष लाभार्थ्यांनी महिलांसाठी असलेल्या या योजनेत अर्ज करून लाभ घेतल्याचेही तपासणीत समोर आले आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधितांवर कडक कारवाई सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच काही सरकारी कर्मचाऱ्यांनीही योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केल्याचे आढळून आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

१ कोटी ६५ लाख महिलांची ई-केवायसी पूर्ण

मुदतवाढ आणि पडताळणी प्रक्रियेनंतर आता राज्यातील १ कोटी ६५ लाख महिलांनी ई-केवायसी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या महिला योजनेसाठी पात्र ठरल्या असून, त्यांना नियमितपणे योजनेचा लाभ मिळत राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

विरोधकांवर टीका करताना फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना बंद व्हावी, यासाठी काँग्रेसचे नेते न्यायालयात गेले होते, असा आरोप केला. मात्र, योजना यशस्वीपणे सुरू असून पारदर्शक पद्धतीने पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचत असल्याचे त्यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.