शिरसोली घरफोडीचा पोलिसांनी उलगडा केला; तिघे जेरबंद, ६.६८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0

जळगाव  । शिरसोली येथील बंद घराला लक्ष्य करून चोरी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तीन संशयितांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोकड आणि मोटारसायकल असा एकूण ६ लाख ६८ हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शिरसोली येथील रहिवासी राजेंद्र दौलत आंबाडकर हे ३० एप्रिल रोजी रात्री घर बंद करून बाहेरगावी गेले होते. त्यानंतर ५ मे रोजी सकाळी ते घरी परतले असता घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. घरातील वस्तूंची पाहणी केली असता साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे निदर्शनास आले. चोरी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ), ३३१ (३) आणि ३३१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरील माहिती, तांत्रिक तपास आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला.

तपासादरम्यान मुन्ना शहा सुलतान शहा (२२) याला मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून ताब्यात घेण्यात आले. मुस्तकीन ऊर्फ जुनेद भिकन शहा (२३) याला बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी धाड परिसरातून पकडण्यात आले. तर जाबीर शहा जावेद शहा (२०) याला भुसावळ येथून ताब्यात घेण्यात आले.पोलिसांच्या तपासात मुस्तकीन ऊर्फ जुनेद शहा याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

दागिने, रोकड अन् दुचाकी जप्त

कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून १० हजार रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा एकूण ६ लाख ६८ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जप्त मुद्देमालामुळे या गुन्ह्याच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर घरफोडी आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जात असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.