पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी विद्यापीठाला निवेदन

0

जळगाव । पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अधिछात्रवृत्ती आणि नोंदणी प्रमाणपत्राशी संबंधित अडचणी तातडीने दूर करण्याच्या मागणीसाठी भाजपा जळगाव महानगरचे जिल्हा चिटणीस भूषण लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली संशोधक विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू एस. टी. इंगळे यांची भेट घेत निवेदन सादर केले.

महाज्योती, नागपूर आणि सारथी, पुणे यांच्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीच्या जाहिरातीतील विद्यार्थी निवडीच्या निकषांमुळे अनेक पात्र संशोधक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. विशेषतः २०२४ मध्ये पीएच.डी. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदणी प्रमाणपत्रावरील ‘Provisional’ शब्द वगळून नियमित Registration Certificate देण्याची मागणी करण्यात आली.

१०० ऐवजी ५०० विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती द्या

अधिछात्रवृत्तीसाठी सध्या निश्चित करण्यात आलेली १०० विद्यार्थ्यांची मर्यादा वाढवून किमान ५०० पात्र विद्यार्थ्यांना लाभ देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी केली. यासाठी विद्यापीठाने महाज्योती आणि सारथीकडे स्वतंत्र शिफारसपत्र पाठवून पात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंतीही करण्यात आली.

अधिछात्रवृत्तीच्या नवीन निकषांमध्ये पदव्युत्तर पदवीसाठी किमान ‘B+’ ग्रेड, वयोमर्यादा तसेच NET, SET आणि PET या पात्रतांचा समावेश करण्यात आला आहे. या निकषांमुळे अनेक पात्र विद्यार्थी अधिछात्रवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले.त्यामुळे वयोमर्यादा पूर्वीप्रमाणे ४५ वर्षे ठेवावी आणि NET, SET व PET या तिन्ही पात्रतांना समान संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच पदव्युत्तर पदवीतील ‘B+’ ग्रेडची अट शिथिल करून पूर्वीचे नियम लागू करण्याची मागणीही करण्यात आली.

संशोधक विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या घरभाडे भत्ता, आकस्मिक खर्च यांसह अन्य सुविधांमध्ये करण्यात आलेली कपातही मागे घेऊन पूर्वीप्रमाणे सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी भूषण लाडवंजारी, अनिल ज्ञानेश्वर हाडे, ॲड. राहुल वाकलकर, अनिल बाविस्कर, शिरीष तायडे, भूषण सोनवणे, भरत पाटील यांच्यासह पीएच.डी. संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

अर्जासाठी १३ दिवस शिल्लक

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आता केवळ १३ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणींचा तातडीने विचार करून संबंधित यंत्रणांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, असे लाडवंजारी यांनी सांगितले. तसेच राज्यातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी आमदार, खासदार, मंत्री तसेच महाज्योती आणि सारथीच्या संबंधित कार्यालयांकडे निवेदने देऊन अधिछात्रवृत्तीचा लाभ अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या मागण्या मुख्यमंत्री स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.