जळगावच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीची जोरदार उसळी
जळगाव । ऐन सणासुदीच्या तोंडावर जळगावच्या प्रसिद्ध सुवर्ण बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा मोठी उसळी घेतली आहे. गेल्या अवघ्या दहा दिवसांत सोन्याच्या भावात प्रति दहा ग्रॅम तब्बल ९ हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात प्रतिकिलोमागे १८ हजार रुपयांची प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. या अनपेक्षित दरवाढीमुळे सुवर्ण बाजारपेठेत मोठी तेजी दिसून येत असली, तरी सर्वसामान्य खरेदीदारांच्या खिशावर मात्र मोठा ताण पडत आहे.

१ ऑगस्ट रोजी सोन्याचा दर १ लाख ४२ हजार ५०० रुपये प्रति १० ग्रॅम (विनाजीएसटी) इतका होता. त्यानंतर सोन्याच्या भावात सातत्याने तेजी दिसून आली. ५ ऑगस्ट रोजी हा दर १ लाख ४५ हजार रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतरही वाढ कायम राहिल्याने मंगळवारी, ११ ऑगस्ट रोजी सोन्याचा भाव १ लाख ५२ हजार रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला. म्हणजेच अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत सोन्याच्या दरात ९ हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे. अचानक झालेल्या या मोठ्या दरवाढीमुळे सराफा बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे.


चांदीतही मोठी तेजी
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. १ ऑगस्ट रोजी चांदीचा दर २ लाख २१ हजार रुपये प्रति किलो (विनाजीएसटी) होता. त्यानंतर चांदीच्या दरानेही सातत्याने वाढ नोंदवली.मंगळवारी चांदीचा भाव २ लाख ३९ हजार रुपये प्रति किलो इतका झाला. त्यामुळे अवघ्या दहा दिवसांत चांदी १८ हजार रुपयांनी महागली आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरातील ही वाढही ग्राहकांसाठी मोठी मानली जात आहे.
सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा फटका
सध्या सणासुदीचा काळ सुरू असून आगामी काळात लग्नसराईलाही सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. विशेषतः लग्नासाठी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करणाऱ्या कुटुंबांना या दरवाढीचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो.