जीव्हाळा क्रेडिट सोसायटीच्या सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; नानजीभाई ठक्कर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

0

ठाणे : जीव्हाळा को-ऑप. क्रेडिट सोसायटी, ठाणे यांची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेला समाजसेवक श्री. नानजीभाई खिमजीभाई ठक्कर (ठाणावाला) यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री. सुरेश महाडिक, श्री. उमेश महाडिक, श्री. हणमंत ढाणे, श्री. अनिल जरग, श्री. मुकेश मोहिरे, श्री. बाळासाहेब निकम, श्री. हितेश व्यास, श्री. संपत ढाणे , श्री. अशोक मुळीक, श्रीमती रुपाली माने, श्रीमती झुलेखा आतार, श्री. महेंद्र जाधव, श्री. सतीश माने, श्री. तुकाराम महाडिक तसेच सोसायटीचे पदाधिकारी, सभासद आणि सर्व कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेदरम्यान सोसायटीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी सोसायटीच्या प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. सभेचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून उपस्थित सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

सभासदांच्या पाल्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून उत्तुंग भरारी घ्यावी तसेच इतर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. महादेव महाडिक यांच्या पुण्यस्मरणार्थ इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षांमध्ये उत्कृष्ट गुण संपादन करणाऱ्या सभासदांच्या पाल्यांपैकी प्रत्येकी दोन गुणवंत विद्यार्थ्यांचा निवड करून त्यांना रु. ५००/- रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक यशासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांनी भविष्यातही उत्कृष्ट कामगिरी करावी, हा संस्थेचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी समाजसेवक श्री नानजीभाई खीमजीभाई ठक्कर (ठाणावाला), यांनी संस्थेच्या कर्मचारीवर्गाचे कौतुक करून त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. सभासदांना उत्तम सेवा देण्यासाठी कर्मचारीवर्गाने नेहमी तत्पर, प्रामाणिक आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले की, “संस्थेची खरी प्रगती ही केवळ आर्थिक व्यवहारांमुळे होत नाही, तर सभासदांना दिल्या जाणाऱ्या विश्वासार्ह व आपुलकीच्या सेवेमुळे होते. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले काम ही केवळ नोकरी न समजता संस्थेच्या प्रगतीतील आपली जबाबदारी म्हणून पार पाडावे.”
यावेळी समाजसेवक श्री. नानजीभाई ठक्कर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम, सातत्य, शिस्त आणि प्रामाणिकपणा अंगीकारावा. केवळ चांगले गुण मिळविणे हेच शिक्षणाचे अंतिम ध्येय नसून, शिक्षणातून चांगला माणूस आणि जबाबदार नागरिक घडणे महत्त्वाचे आहे.
“आज तुम्हाला मिळालेला हा सन्मान तुमच्या पुढील यशाची प्रेरणा ठरावा. शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची प्रगती करण्याबरोबरच आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करा. अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकून पुन्हा प्रयत्न करा,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचा, शिक्षकांचा आणि ज्येष्ठांचा सदैव आदर करावा, चांगले संस्कार जोपासावेत आणि भविष्यात समाजासाठी काहीतरी योगदान देण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही नानजीभाई ठक्कर यांनी केले.
जीव्हाळा को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वतीने समाजसेवक श्री. नानजीभाई ठक्कर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेच्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह व शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे समाजसेवक श्री. नानजीभाई ठक्कर यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीबद्दल जीव्हाळा को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संस्थेच्या पदाधिकारी, कर्मचारीवर्ग तसेच सभासदांना निश्चितच प्रेरणा मिळाली.

Leave A Reply

Your email address will not be published.