भुसावळात 55 वर्षीय पूजाऱ्याची निर्घृण हत्या; डोक्यात टणक वस्तूने वार

0

भुसावळ | प्रतिनिधी : भुसावळ शहराजवळील झेडटीआरआय बोगद्याजवळील मंदिर परिसरात 55 वर्षीय पूजाऱ्याची अज्ञात व्यक्तीने डोक्यात टणक वस्तूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (29 जून) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे भुसावळ शहरासह परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

मृत पूजाऱ्याचे नाव संतोष रघुवीर मंचल (वय 55, रा. झेडटीआरआय परिसर, भुसावळ) असे आहे. ते आरपीडी रस्त्यावरील लष्करी डेपोपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील तीन मंदिरांमध्ये पूजारी म्हणून सेवा बजावत होते.

सोमवारी सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास त्यांच्या कुटुंबातील सदस्य मंदिरात गेले असता संतोष मंचल यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्यावर टणक वस्तूने वार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने शहर पोलिसांना कळविले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, शहर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड तसेच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. तपासासाठी जळगाव येथून ठसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.

प्राथमिक तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झाले असले तरी हत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. निर्जन परिसर असल्याने आरोपीने संधी साधून हा गुन्हा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परिसरातील पुरावे गोळा करण्यासह संशयितांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

या घटनेमुळे धार्मिक परिसरातही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पूजाऱ्याच्या हत्येमागील नेमके कारण काय, याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.