बळीराजासाठी आनंदाची बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल; राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई | मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्रात अधिकृतपणे प्रवेश केला असून तळकोकणात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून आता वेगाने पुढे सरकत असून लवकरच संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे.

यंदा मान्सूनने केरळमध्ये ४ जून रोजी, म्हणजे नेहमीपेक्षा तीन दिवस उशिरा हजेरी लावली होती. त्यानंतर त्याचा वेग वाढला असून कर्नाटक, तामिळनाडू मार्गे तो आता कोकण आणि गोव्यात दाखल झाला आहे. पुढील काही दिवसांत मुंबईसह राज्यातील अनेक भागांत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावत उष्णतेपासून काहीसा दिलासा दिला होता. मात्र, या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीपिकांचे नुकसानही झाले. आता नियमित मान्सून सुरू झाल्याने शेतकऱ्यांना पेरणीच्या कामांना गती देता येणार असून कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे.
आज अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा
मान्सूनच्या पुढील वाटचालीमुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील अनेक भागांत पुढील दोन दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांसह पश्चिम किनारपट्टीवरही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, ६ जून रोजी कोकणापासून विदर्भापर्यंत राज्यातील २५ जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
मान्सूनच्या आगमनामुळे राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत अनेक भागांत जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.