सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या चरित्रग्रंथ ‘एकमेव : जनामनाचा असामान्य शिल्पकार’ चे शानदार सोहळ्यात प्रकाशन

0

 मुंबई |  जीवनविद्या तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक, तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि लाखो लोकांना जीवनाची दिशा देणारे परमपूज्य सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या १४ व्या पुण्यस्मरणाचा सोहळा शनिवारी दादर येथील योगी सभागृहात मोठ्या भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे परमपूज्य सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या अधिकृत चरित्रग्रंथ ‘एकमेव : जनामनाचा असामान्य शिल्पकार’ याचे प्रकाशन सद्गुरूंचे सुपुत्र, जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाददादा वामनराव पै, सदगुरुंची सुकन्या श्रीमती मालन कामत, जागतिक अर्थतज्ञ डॅा. प्रसाद प्रधान, ज्येष्ठ पत्रकार निलेश जाधव, सदगुरूंचे नातू श्री. निखिल प्रल्हाद पै, नातसून सौ. प्रिया निखिल पै, पणतू कु. यश निखिल पै तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो नामधारक, जीवनविद्या अभ्यासक, कार्यकर्ते, सद्गुरुंच्या विचारांचे चाहते आणि मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. जीवनविद्या तत्त्वज्ञान, कृतज्ञता, सदगुरुस्मरण यांचा अनोखा संगम असलेला हा सोहळा अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सद्गुरूप्रणित उपासना यज्ञाने झाली. नामसंकीर्तने, सद्गुरुभावातील गीते व सद्गुरूंच्या सहवासातील गोड आठवणींनी उपस्थितांना अक्षरशः एका वेगळ्याच भावविश्वात नेलेया कार्यक्रमात कविवर्य कै शांताराम नांदगावकर यांनी १९७५ साली रचलेले ‘तूच तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार’ हे गीत प्रकाशित करण्यात आले. या गीतासाठी श्री प्रशांत नांदगावकर व सुहासिनी नांदगावकर यांचे विशेष सहाय्य लाभले. सद्गुरूंनी दिलेल्या आगळ्या वेगळ्या जीवनदृष्टीचा आणि जीवनविद्येच्या मूलभूत संदेशाचा प्रत्यय देणाऱ्या या गीताच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘एकमेव : जनामनाचा असामान्य शिल्पकार’
या चरित्रग्रंथामध्ये सद्गुरूंचे जीवनकार्य, त्यांचे समाजप्रबोधनातील योगदान, जीवनविद्येचा प्रवास आणि या तत्त्वज्ञानातून लाखो लोकांच्या जीवनात घडविलेल्या परिवर्तनाचा व्यापक आढावा घेण्यात आला आहे. चरित्रग्रंथाचे प्रकाशन होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि विठ्ठलनामाच्या गजरात या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत केले.

यावेळी विश्वस्त श्री समीर भांबरे यांनी ‘एकमेव’ या शीर्षकामागील संकल्पना, चरित्र निर्मितीचा प्रवास आणि त्यातील काही महत्त्वाचे आशय याविषयी सविस्तर माहिती दिली. पद्मश्री अच्युत पालव यांनी साकारलेल्या कॅलिग्रॅफीमुळे या चरित्राच्या मुखपृष्ठाला एक वैशिष्ट्यपूर्ण कलात्मकता प्राप्त झाली आहे. कार्यक्रमात जीवनविद्या मिशनचे अध्यक्ष श्री. जयंत जोशी यांच्या मनोगताद्वारे संस्थेच्या कार्याची दिशा अधिक स्पष्ट करण्यात आली. श्री प्रल्हाद पै यांनी आपल्या मार्गदर्शनातून सद्गुरूंच्या विचारांचा वारसा, जीवनविद्येचे महत्त्व आणि भावी पिढ्यांपर्यंत हा विचारप्रवाह पोहोचविण्याची आवश्यकता अधोरेखित केली. जीवनविद्येचे महत्त्व सांगत त्यांनी आपल्या प्रत्येक कृतीतून इतरांना कसा आनंद द्यायचा याची शिकवण दिली. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या सर्व स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले. श्रीसदगुरु कार्याचा आवाका फार मोठा असल्याने त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीतून या चरित्राला नित्य नूतन ठेवण्यासाठी मल्टी मीडियाची जोड दिल्याचे सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत त्यांनी अनोख्या पद्धतीने या चरित्राची निर्मिती केली असून या चरित्राचे वाचन करताना प्रत्येकाला एक वेगळीच अनुभूती मिळेल याची ग्वाही दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.