इगतपुरीत भूमाफियांचा सुळसुळाट ; नातेवाईकांची जमीन बळकावल्याचा आरोप.
इगतपुरी | नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असतानाही भूमाफियां विरोधात कारवाई सुरू असताना इगतपुरी तालुक्यातील मौजे दौंडत येथे जमीन बळकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नातेवाईकांच्या अज्ञानाचा फायदा घेत फसवणुकीच्या माध्यमातून जमीन लाटल्याचा आरोप समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहिदास धजू भरीत (रा. शेवगेडांग, ता. इगतपुरी) व त्याचा साथीदार सोमनाथ बोराडे यांनी आपल्या सख्ख्या नातेवाईक (मावशी) यांना विश्वासात घेत गोड बोलून जमीन व्यवहार घडवून आणला. सुरुवातीला केवळ आगाऊ रक्कम देण्यात आली, तर उर्वरित रक्कम धनादेशाद्वारे देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, दिलेले धनादेश बँकेत वटले नसल्याचे समोर आले आहे.तसेच, व्यवहारा दरम्यान केवळ १० लाख रुपये रोख देण्यात आले. याशिवाय भारतीय स्टेट बँक, देवळाली कॅम्प शाखेतून सुमारे सव्वा पाच लाख रुपये एका आठवड्यात परत देतो असे सांगून काढून घेण्यात आले; मात्र ही रक्कम आजपर्यंत परत करण्यात आलेली नाही. उर्वरित रक्कमही न दिल्याचा गंभीर आरोप पीडितां कडून करण्यात आला आहे.


दरम्यान, पैसे मागण्यासाठी संबंधित नातेवाईक गेले असता टाळाटाळ करणे, फोन न उचलणे तसेच धमकावण्याचे प्रकार झाल्याचे सांगण्यात आले. काही प्रभावशाली व्यक्तींशी संबंध असल्याचे सांगत दबाव टाकण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे.
या प्रकरणात उषा कुंडलिक कटारे (रा. देवळाली कॅम्प), इंदुबाई यशवंत पंडित (रा. कल्याण) तसेच राजेंद्र, विजय व विनोद आव्हाड (रा. विक्रोळी, मुंबई) यांनी गेल्या तीन वर्षांपासून वारंवार पाठपुरावा करूनही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
दरम्यान, इगतपुरी येथील उपनिबंधक कार्यालयात खरेदीखत नोंदवून व्यवहार पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात संपूर्ण रक्कम अदा न करता जमीन हस्तांतरित केल्याचा आरोप होत आहे.
स्थानिक पातळीवर रोहिदास भरीत हा आलिशान वाहनांचा वापर करत असून विरोध करणाऱ्यांना आर्थिक प्रलोभन देऊन गप्प बसवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. शेवगेडांग (ता. इगतपुरी) येथे त्याच्या बंगल्याचे बांधकाम सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे.या संपूर्ण प्रकारामुळे नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याची भावना व्यक्त होत असून संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.