कामावरून घरी परतताना भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत ४८ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू

0

जळगाव । जळगाव शहरात अपघाताच्या घटना वाढताना दिसत असून याच दरम्यान, आर. एल. चौफुलीजवळ भीषण अपघात झाला. कामावरून दुचाकीने घरी परतत असताना भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत ४८ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. २६ जुलै रोजी घडली. संदीप सुपडू अलकरी (वय ४८, रा. अयोध्या नगर, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप अलकरी हे अयोध्यानगर परिसरात पत्नी व दोन मुलांसह राहत होते. ते एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीत कामाला होते. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते कामावर गेले होते. दुपारचे काम आटोपून सुमारे साडेतीन वाजता ते दुचाकीने घरी निघाले होते.

राष्ट्रीय महामार्गावरील आर. एल. चौफुलीजवळ पोहोचताच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, संदीप अलकरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.