राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण; जळगावसह अनेक जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा

0

मुंबई | राज्यात जुलैच्या पहिल्या सहा दिवसांत मुसळधार पावसाने हाहाकार माजविल्यानंतर काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे अनेक भागांत उकाडा वाढला असून नागरिकांसह शेतकरीही चिंतेत होते. मात्र आता राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून आज अनेक जिल्ह्यांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणातील ठाणे आणि रायगड, मध्य महाराष्ट्रातील नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर आणि पुणे घाटमाथा, तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याशिवाय मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा घाटमाथा, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, पावसाबरोबरच अनेक भागांत उकाडाही कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, तसेच मेघगर्जना आणि विजांच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. आगामी काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.