जळगावात घंटागाडी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; कचरा संकलन सेवा ठप्प

0

जळगाव । जळगाव महानगरपालिकेअंतर्गत घराघरांतून कचरा संकलन करणाऱ्या कंत्राटी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनाच्या मागणीसाठी आज बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. परिणामी शहरातील कचरा संकलन सेवा ठप्प झाली असून स्वच्छता व्यवस्थेवर त्याचा थेट परिणाम होत आहे. ऐन पावसाळ्यात ही परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.

महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाचे काम खासगी कंत्राटदार बीव्हीजी (BVG) ग्रुपकडे सोपविले आहे. मात्र, कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की गेल्या दीड महिन्यापासून त्यांना वेतन मिळालेले नाही. सतत पाठपुरावा करूनही वेतनाबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

९०० कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न

घंटागाडी सेवेत कार्यरत असलेल्या सुमारे ९०० कर्मचाऱ्यांवर वेतनाअभावी आर्थिक संकट ओढवले आहे. कुटुंबाचा खर्च, घरभाडे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले असल्याचे आंदोलक कर्मचाऱ्यांनी सांगितले. अनेक वेळा संबंधित प्रशासन आणि कंत्राटदाराकडे वेतनाची मागणी करूनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप त्यांनी केला.

आंदोलक कर्मचाऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेत, थकीत वेतन खात्यात जमा होईपर्यंत कामावर हजर होणार नसल्याचे जाहीर केले आहे. “नियमित सेवा देऊनही वेळेवर वेतन मिळत नसेल, तर काम कसे करायचे? आमच्या हक्काचा मोबदला मिळाल्याशिवाय आंदोलन सुरूच राहील,” अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी मांडली.

शहराच्या स्वच्छतेवर परिणाम

कामबंद आंदोलनामुळे शहरातील अनेक भागांत घरगुती कचरा उचलला गेला नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसांत कचरा साचल्यास दुर्गंधी, डासांची वाढ आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडूनही होत आहे.

मनपा आणि कंत्राटदाराची भूमिका महत्त्वाची

या आंदोलनामुळे आता जळगाव महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार कंपनीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. थकीत वेतनाचा प्रश्न तातडीने निकाली काढून कचरा संकलन सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.