जळगावात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा; हवामान खात्याचा नवा अंदाज
जळगाव | राज्यात मान्सूनचा जोर अद्याप सर्वत्र समान नसल्याने अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढत असताना जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून खरीप पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आज कोकण, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी तसेच पुणे व सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


मात्र, जळगाव जिल्ह्यात आज मोठ्या पावसाची शक्यता नसून वातावरण ढगाळ राहण्याची आणि काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मंगळवारी जळगाव, धुळे, नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे घाटमाथा परिसरासाठी मंगळवारी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, रत्नागिरी, नाशिक आणि सातारा घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा अंदाज आहे.
जळगाव जिल्ह्यात पावसाने अद्याप अपेक्षित हजेरी लावलेली नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगामातील पिकांना पावसाची नितांत गरज असून उकाडा आणि दमट हवामानामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. येत्या दोन दिवसांत हलक्या सरींची शक्यता असली तरी जोरदार पावसासाठी अजून प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.