1 जुलैपासून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; जळगावसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
जळगाव : राज्यात मॉन्सून सक्रिय होण्यास सुरुवात झाली असून, 1 जुलैपासून अनेक भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने जळगावसह अनेक जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवस यलो अलर्ट जारी केला आहे.

यंदा मॉन्सूनने 2 जून रोजी केरळमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर अरबी समुद्रात सुमारे 15 दिवस रेंगाळल्याने महाराष्ट्रात त्याचे आगमन उशिरा झाले. त्यामुळे जून महिन्यात राज्यातील अनेक भागांत अपेक्षित पाऊस झाला नाही आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या.


मात्र, जूनच्या अखेरीस मॉन्सूनने वेग घेतला असून, राज्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 1 जुलैपासून पावसाचा जोर आणखी वाढणार असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यभर समाधानकारक पावसाची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यासाठी यलो अलर्ट
जळगाव जिल्ह्यातही पावसाने उशिरा का होईना सुरुवात केली आहे. हवामान विभागाने 29, 30 जून आणि 2 जुलै रोजी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच 1 ते 5 जुलै या कालावधीतही जिल्ह्यासाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता
राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी पूर्ण केली असली तरी पुरेशा पावसाअभावी अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत. आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यास खरीप हंगामाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसावर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी यापूर्वी व्यक्त केली होती. तरीही सध्या मॉन्सून सक्रिय होत असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची तसेच पाणीटंचाईच्या समस्येत काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.