महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा ; या जिल्ह्यांना अलर्ट जारी

0

मुंबई । राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस कमी-अधिक प्रमाणात सुरू असतानाच भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज (५ ऑगस्ट) पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरांमध्येही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज असून, रात्रीपासून अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे.

६ ते ९ ऑगस्टदरम्यान वादळी पावसाचा अंदाज

हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार ६ ते ९ ऑगस्टदरम्यान पश्चिम मध्य प्रदेशात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्यासह वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच पूर्व मध्य प्रदेशात ५ ते ९ ऑगस्ट आणि देशातील विविध भागांत ४ ते ९ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बुलढाण्यात अतिवृष्टी, तरीही खडकपूर्णा धरण कोरडेच

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश नद्या-नाले वाहू लागले असून, १३ पैकी ११ तालुक्यांतील ९१ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खडकपूर्णा धरणातील जिवंत जलसाठा अद्याप शून्य टक्के आहे.

धरणाला पाणी पुरवणाऱ्या मराठवाडा भागात अपेक्षित पाऊस न झाल्याने जलसाठ्यात वाढ झालेली नाही. गेल्या २४ तासांत धरणात केवळ २०० दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली असून, धरणाला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

कोकणात नद्या दुथडी भरून वाहत आहेत

दुसरीकडे कोकणात समाधानकारक पाऊस सुरू असून अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीची पातळी ५.४० मीटर नोंदविण्यात आली आहे. पुढील तीन दिवसांसाठी कोकणात यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, घाटमाथा आणि विदर्भातील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.