प्लास्टिकमुक्त बाजारपेठ जनजागृती अभियान
अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

जळगाव । प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरणासाठी गंभीर समस्या ठरत असताना, त्याच्या वापराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेअंतर्गत ‘प्लास्टिकमुक्त बाजारपेठ – जनजागृती अभियान’ राबविण्यात आले. शाळेतील स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी हरी विठ्ठल नगर परिसरात प्रत्यक्ष भेटी देत दुकानदार, किराणा व्यावसायिक तसेच मेडिकल व्यावसायिकांशी संवाद साधून प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले. या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी परिसरातील दुकानदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. “आपण स्वतः प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका आणि आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांनाही प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यापासून परावृत्त करा,” असे आवाहन विद्यार्थ्यांनी दुकानदारांना केले. प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्या, कागदी पिशव्या किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर करण्याचे महत्त्वही त्यांनी समजावून सांगितले.


विद्यार्थ्यांनी केवळ प्लास्टिक न वापरण्याचा संदेश न देता व्यापारी आणि ग्राहक या दोन्ही स्तरांवर पर्यावरणपूरक सवयी निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. दुकानातून ग्राहकांना प्लास्टिकची पिशवी देण्याऐवजी त्यांना स्वतःची कापडी किंवा पुनर्वापर करता येणारी पिशवी आणण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. ‘प्लास्टिक कमी करा, पर्यावरण वाचवा’, ‘प्लास्टिकला नकार, पर्यावरणाला आधार’ अशा संदेशांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांचा थेट संवाद, साध्या भाषेतील प्रभावी आवाहन आणि पर्यावरणाविषयीची कळकळ यामुळे या जनजागृती उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ शाळेपुरते स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचे धडे न देता समाजात जाऊन प्रत्यक्ष जनजागृती करण्याची संधी मिळत आहे. स्वच्छ परिसर निर्माण करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाची आवश्यकता असून, दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या सवयींमध्ये बदल केल्यास प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यास मोठी मदत होऊ शकते, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
हा उपक्रम प्राचार्य रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता समन्वयक राजेंद्र बावस्कर, शिवम सोनवणे, पूजा पाटील व भावना शिंदे यांनी सहकार्य केले. स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ‘प्लास्टिकमुक्त परिसर ही केवळ घोषणा नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.