राज्यात ऑक्टोबर हीटचा चटका! अनेक शहरांत तापमान ३५° पार
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असताना राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान ३५ अंशांच्या पुढे गेलंय आहे. त्यामुळे नागरिकांना ‘ऑक्टोबर हीट’चा त्रास जाणवत आहे. आज 8 ऑक्टोबर रोजी राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

महाराष्ट्राच्या निम्म्या भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. बुधवारी मान्सूनची परतीची वाटचाल सुरू होती. मान्सूनच्या पुढील परतीसाठी सध्या हवामान पोषक आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागांतून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता आहे.


पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक आणि गोव्यापर्यंत समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. तसंच मध्य महाराष्ट्रापासून मन्नारच्या आखातापर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
राज्यात उन्हाचा चटका वाढला
राज्यात सध्या उन्हाचा चटका जाणवत आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत अमरावतीमध्ये राज्यातील सर्वाधिक ३९.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय. वर्ध्यामध्ये ३८ अंश तापमानाची नोंद झाली. तर अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धुळे आणि चंद्रपूरमध्ये ३७ अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदवलं गेलंय. दुसरीकडे जळगावमध्ये राज्यातील सर्वात कमी १७.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आलंय.
कोल्हापूर, सांगलीत विजांसह पाऊस
राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात आकाश काही प्रमाणात ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.