नशिराबाद येथे कौटुंबिक वादातून पत्नीची कोयत्याने वार करून हत्या; पतीला अटक

0

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.२२) दुपारी घडली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अवघ्या एका तासाच्या आत अटक केली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकास जगन्नाथ जाधव (वय ३७, रा. चिंचखेडा, ता. जामनेर) आणि त्याची पत्नी मंदा विकास जाधव हे सेंट्रिंगचे काम करत असून नशिराबाद येथील भवानीनगर भागात वास्तव्यास होते. त्यांना सात वर्षांचा मुलगा असून त्याला नशिराबाद येथील खंडोबाराया मंदिराजवळील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी मंदा जाधव सोमवारी दुपारी तेथे गेल्या होत्या.

दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास खंडोबाराया मंदिर परिसरात आणि शाळेच्या भिंतीलगत पती-पत्नीमध्ये वाद झाला. दोघांमध्ये पूर्वीपासून कौटुंबिक वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी दारूच्या नशेत असलेल्या विकास जाधव याने संशयाच्या कारणावरून पत्नीवर कोयत्याने वार केले. गंभीर जखमी झालेल्या मंदा जाधव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे, हेड कॉन्स्टेबल गुणवंत देशमुख, भरत बाविस्कर, शिवदास चौधरी, विजय अहिरे, विठ्ठल मुंडे, प्रशांत विरणारे, राजेंद्र ठाकरे आणि पंकज सोनवणे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपी जवळच असलेल्या एका घरात लपून बसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.