नगरदेवळा स्टेशन येथे ८०० रुपयांसाठी एका इसमाची दगडाने ठेचून हत्या
एका विरुद्ध भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल; मृतक जुगा कांतीलाल पवार याचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला आढळला

भडगांव प्रतिनिधी:-


भडगाव तालुक्यातील नगरदेवळा रेल्वे स्टेशन परिसरात ८०० रुपयांच्या कारणावरून एका इसमाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात धर्मा भाता पवार (रा. निपाणे रस्ता, नगरदेवळा, ता. पाचोरा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडे दाखल फिर्यादीनुसार,मयत जुगा कांतीलाल पवार (वय ४०, व्यवसाय मजुरी, रा. निपाणे रस्ता,नगरदेवळा ता. पाचोरा) हा २१ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास नगरदेवळा येथील वस्तीच्या जवळ असलेल्या रस्त्याच्या बाजूला होता. याचवेळी त्याच्या गल्लीतील धर्मा भाता पवार याने जुगा पवार यांच्याकडे असलेले ८०० रुपये काढून घेण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर दगडाने हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या हल्ल्यात जुगा पवार यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली.
मयताची आई आशाबाई कांतीलाल पवार (वय ६५) यांनी याप्रकरणी भडगांव पोलिसात फिर्याद दिली आहे. घटनेची नोंद २२ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४.५७ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली.
पोलिस तपासाला वेग
या गंभीर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत. प्रकरणात वापरण्यात आलेले हत्यार म्हणून दगड नमूद करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमागील नेमके कारण, पैशांचा व्यवहार आणि हल्ल्याची परिस्थिती याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
या घटनेमुळे नगरदेवळा परिसरात खळबळ उडाली असून, केवळ ८०० रुपयांच्या कारणावरून एका इसमाचा जीव गेल्याच्या घटनेने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.