चोपड्यावर शोककळा; चारधाम यात्रेला गेलेल्या महिलेचे उत्तराखंडमध्ये निधन

0

चोपडा । चारधाम यात्रेसाठी गेलेल्या चोपडा येथील प्रतिभा नारायण बोरोले (वय ५९) यांचे उत्तराखंडमध्ये उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. बद्रीनाथचे दर्शन होण्याच्या अवघ्या एक दिवस आधीच त्यांची प्रकृती बिघडली आणि १ मे रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे चोपडा शहरासह परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे त्यांचे पार्थिव मुंबईपर्यंत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

चोपडा शहरातील पंकज नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या प्रतिभा बोरोले या चोपड्यातील १६ भाविकांच्या एका गटासोबत धार्मिक भावनेतून चारधाम यात्रेला गेल्या होत्या. यात्रेच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या गटाने यमुनोत्री, गंगोत्री आणि केदारनाथ या पवित्र स्थळांचे अतिशय उत्साहात आणि विधिवत दर्शन घेतले.

यात्रेचा शेवटचा टप्पा म्हणून बद्रीनाथ मंदिराचे दर्शन नियोजित होते. मात्र, दर्शनाच्या आदल्या दिवशी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि अस्वस्थता वाढली. डोंगराळ भाग आणि उंचीमुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने त्यांची तब्येत अधिकच खालावत गेली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहप्रवाशांनी तातडीने वैद्यकीय मदतीसाठी धावपळ सुरू केली.

प्रतिभा बोरोले यांची तब्येत गंभीर होत असल्याने त्यांना केदारनाथ परिसरातून तातडीने खाली आणण्यात आले आणि चमोली जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू करून त्यांना ऑक्सिजन सपोर्टही दिला; मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर १ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

प्रतिभा बोरोले या चोपडा येथील माजी नगरसेवक नारायण बोरोले यांच्या पत्नी, तर पंकज समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांच्या वहिनी होत्या. तसेच चोपड्याचे उपनगराध्यक्ष पंकज बोरोले यांच्या त्या काकू होत्या. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य म्हणून सर्वांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या आणि सामाजिक-धार्मिक कार्यात नेहमी सक्रिय असणाऱ्या प्रतिभा बोरोले यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण बोरोले कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.