महाराष्ट्र्रातील शाळा सुरू होण्याची तारीख पुन्हा बदलली; ३० जूनपासून सुरू करण्याचे निर्देश

0

उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे विदर्भातील शाळा सुरू होण्याच्या तारखेबाबत पुन्हा एकदा मोठा बदल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने २२ जूनपासून शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय नागपूर खंडपीठाने रद्द केला असून आता विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

यापूर्वी शिक्षण विभागाने विदर्भातील शाळा १५ जूनऐवजी २२ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच २२ ते ३० जून या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात चालविण्याचे आदेशही जारी करण्यात आले होते. मात्र या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.

याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने शिक्षण संचालकांनी जारी केलेल्या आदेशांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. नागपूर खंडपीठाने २२ जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे निरीक्षण नोंदवत, न्यायालयीन आदेश असताना असा निर्णय का घेण्यात आला, असा सवाल उपस्थित केला.

सुनावणीदरम्यान राज्य सरकारने राज्यभरातील शाळा एकसमान वेळापत्रकानुसार सुरू करण्याची भूमिका मांडली. मात्र त्यावर न्यायालयाने, “जर एकसमानता आणायचीच असेल तर १५ जून किंवा १ जुलै का नाही?” असा प्रश्न उपस्थित करत सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (School Reopen)

यानंतर न्यायालयाने शिक्षण संचालकांनी जारी केलेली दोन्ही आदेशपत्रे रद्द करत विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे विदर्भातील सुमारे २० हजार शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.दरम्यान, राज्यातील इतर भागांमध्ये पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार शाळा सुरू होणार असून, विदर्भातील विद्यार्थ्यांना मात्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त सुट्टीचा लाभ मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.