जामनेरचा भूकरमापक २०० रुपयांची लाच घेताना जाळ्यात

0

जळगाव : जिल्ह्यात सुमारे १४ वर्षांपूर्वी लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेल्या भूमिअभिलेख विभागातील भूकरमापकाला पुन्हा एकदा लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले. शेतीच्या मोजणीसाठी आवश्यक असलेले पत्रक आणि टिपण उताऱ्याच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी तब्बल ७०० रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर २०० रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शविल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.

भगवान रोहिदास गायकवाड (५१, रा. भुसावळ), असे एसीबीकडून कारवाई करण्यात आलेल्या भूकरमापकाचे नाव आहे. मंगळवारी जामनेर येथील भूमिअभिलेख विभागाच्या उपअधीक्षक कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

७०० रुपयांऐवजी २०० रुपये लाच
नेरी बुद्रूक (ता. जामनेर) येथील ६५ वर्षीय शेतकऱ्याला त्यांच्या शेतीची मोजणी करायची होती. त्यासाठी आवश्यक असलेले स्कीम पत्रक आणि टिपण उतारा मिळविण्यासाठी त्यांनी २ सप्टेंबर रोजी जामनेर येथील भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. संबंधित कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी भूकरमापक भगवान गायकवाड यांनी तक्रारदाराकडे ७०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित शेतकऱ्याने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली. जामनेर येथील भूमिअभिलेख विभागाच्या उपअधीक्षक कार्यालयात झालेल्या या पडताळणीदरम्यान गायकवाड यांनी शेतीच्या मोजणीसाठी आवश्यक असलेले पत्रक आणि टिपण उताऱ्याच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर ७०० रुपयांऐवजी २०० रुपये स्वीकारण्यास त्यांनी संमती दर्शविल्याचे एसीबीच्या कारवाईत समोर आले. त्यानंतर लाच स्वीकारण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी एसीबीच्या पथकाने सापळा रचला.

२०० रुपये स्वीकारताच झडप
तक्रारदाराकडून २०० रुपयांची लाच स्वीकारताच आजूबाजूला दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने भूकरमापक भगवान गायकवाड यांच्यावर झडप घातली. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जामनेर भूमिअभिलेख कार्यालयात खळबळ उडाली. विशेष म्हणजे, याच कर्मचाऱ्यावर यापूर्वीही लाच स्वीकारल्याचा आरोप झालेला असल्याने या कारवाईकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.