विनोद तावडे–एकनाथ खडसे भेटीने पुन्हा रंगल्या चर्चांना उधाण; भाजपमध्ये घरवापसीच्या चर्चांना वेग
जळगाव | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथराव खडसे आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांची मुंबईतील भेट सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार का, अशा चर्चांना नव्याने उधाण आले आहे.

एकनाथ खडसे हे भाजपमधील ओबीसी समाजाचे प्रभावी आणि उत्तर महाराष्ट्रातील पक्षाचे प्रमुख नेते म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. आमदार, विरोधी पक्षनेते, महसूलमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. उत्तर महाराष्ट्रात भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो.


मात्र, भोसरी जमीन प्रकरणानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पक्षात आपल्याला डावलले जात असल्याची भावना त्यांनी अनेकदा सार्वजनिकपणे व्यक्त केली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढलेले मतभेद, मंत्री गिरीश महाजन यांच्याशी असलेला राजकीय संघर्ष आणि बदललेली पक्षांतर्गत समीकरणे यामुळे अखेर त्यांनी भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला.
राष्ट्रवादीत प्रवेशानंतर शरद पवार यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत विधान परिषदेवर संधी दिली. त्यानंतर खडसे यांनी सातत्याने भाजपवर टीका केली. मात्र, राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींनंतर त्यांच्या भाजपमध्ये पुनरागमनाच्या चर्चांनी वेळोवेळी जोर धरला. लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पुन्हा पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. केंद्रीय नेतृत्व सकारात्मक असल्याचे बोलले जात असले, तरी राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांच्या विरोधामुळे तो निर्णय पुढे सरकला नसल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगितले जात होते.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी मुंबईतील निवासस्थानी जाऊन एकनाथ खडसे यांची भेट घेतल्याने पुन्हा राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणे, भाजपची संघटनात्मक बांधणी आणि अनुभवी नेतृत्वाला पुन्हा पक्षात आणण्याच्या शक्यतांच्या चर्चांना या भेटीमुळे आणखी बळ मिळाले आहे.मात्र, या सर्व चर्चांवर स्वतः एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी भेट झाल्याची पुष्टी करताना कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.
“विनोद तावडे हे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची भेट घेण्यासाठी माझ्या मुंबईतील निवासस्थानी आले होते. त्यावेळी त्यांनी माझीही भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. काही वेळ वैयक्तिक गप्पा झाल्या; मात्र या भेटीत कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही,” असे खडसे यांनी सांगितले.