कॉलेज परिसरात वाहतूक पोलिसांची कडक मोहीम; अल्पवयीन चालकांसह नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

0

जळगाव । जळगाव शहरातील महाविद्यालयीन परिसरात वाढत्या वाहतूक नियमभंगाच्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव वाहतूक शाखेने विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत अल्पवयीन वाहनचालकांसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कठोर कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे काही काळ कॉलेज परिसरात खळबळ उडाली.

मोहिमेदरम्यान वाहनांची तपासणी करताना २४ अल्पवयीन विद्यार्थी वाहन चालविताना आढळून आले. संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना तातडीने घटनास्थळी किंवा पोलीस कार्यालयात बोलावण्यात आले. त्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देऊ नयेत, तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या.

याशिवाय हेल्मेटचा वापर न करणे, आवश्यक कागदपत्रांचा अभाव, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि इतर विविध प्रकारच्या नियमभंगांवरही पोलिसांनी कारवाई केली. या मोहिमेत एकूण १ लाख ४७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून त्यापैकी ८२ हजार रुपये घटनास्थळीच वसूल करण्यात आले. तसेच नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध ११९ ई-चलन (e-Challan) जारी करण्यात आले.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अल्पवयात दुचाकी चालविण्याचे प्रमाण वाढत असल्याने रस्ते अपघातांची शक्यता वाढते. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी जनजागृतीसह दंडात्मक कारवाईवर भर दिला आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांना विनापरवाना वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले.

ही विशेष मोहीम प्रोबेशनरी उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) सह्याद्री बिर्ले आणि प्रशांत दरेकर यांनी पोलीस निरीक्षक (वाहतूक) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली. शहरात वाहतूक शिस्त निर्माण करण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने अशा विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.