जळगाव बाजार समितीच्या सभापतीविरोधात १२ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव ; राजकीय वर्तुळात खळबळ

0

जळगाव । जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा राजकीय भूकंप झाला असून विद्यमान सभापती सुनील महाजन यांच्या विरोधात १८ पैकी १२ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर करण्यात आला असून आठ महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतराची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

गेल्या वर्षी याच बाजार समितीत मोठी उलथापालथ घडली होती. त्या वेळी महाजन यांनी १३ संचालकांच्या पाठिंब्यावर तत्कालीन सभापती श्यामकांत सोनवणे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणून सत्ता हस्तगत केली होती. मात्र आता परिस्थिती उलटली असून सोनवणे हेच बंडखोर संचालकांसोबत पुढाकार घेत असल्याचे दिसत आहे.

सभापती निर्णय प्रक्रियेत कोणालाही सहभागी करून घेत नाहीत, मनमानी पद्धतीने सभा घेतात आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती लपवून ठेवतात, असा गंभीर आरोप संचालकांनी केला आहे. दरम्यान, प्रस्ताव सादर झाल्यानंतर संचालकांनी भ्रमणध्वनी बंद करून सहलीला गेल्याची माहिती समोर आल्याने पुढील राजकीय हालचालींबाबत उत्सुकता वाढली आहे. या घडामोडींमुळे बाजार समितीतील सत्तासमीकरण पुन्हा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.