हिंदू-मुस्लिम रक्षाबंधन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिव मुद्रा प्रभुजी सामाजिक संस्था आणि ठाणे पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू-मुस्लिम रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम श्री ठाणे हालय लोहाणा महाजन ट्रस्ट, रघुवंशी सभागृह, खरकरआळी, ठाणे येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला शिक्षणमहर्षी श्री. नानजीभाई खीमजीभाई ठक्कर (ठाणेवाला) प्रमुख उपस्थित होते. पोलीस उपायुक्त श्री. बाळासाहेब पाटील यांनी विशेष संदेश देत रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार श्री. संजय केळकर तसेच श्रीमती ऋतुजा आव्हाडा यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

शिव मुद्रा प्रभुजी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. सचिन चौहान, श्री. साजिद खाकीयानी, श्री. शरद भेलसेकर, श्री. भाई सोनावणे, श्री. नितीन ठक्कर, श्री. जहरीशा खान, श्री. भाई सोनाणे अग्रवाल, श्रीमती शशी अग्रवाल, श्री. फौरकान सेफी, श्रीमती आशा खाडे तसेच शाळेतील विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव-भगिनी उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या प्रारंभी नानजीभाई ठक्कर, बाळासाहेब पाटील आणि संजय केळकर यांच्या हस्ते रक्षाबंधन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनीही रक्षाबंधन करून घेतले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भगिनी उपस्थित होत्या.यावेळी संस्थेच्या 17 वर्षांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. दरवर्षीपेक्षा यंदा अधिक मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले असून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी नानजीभाई ठक्कर यांनी सांगितले की, भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधन हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा सण प्रामुख्याने पारंपरिक हिंदू कुटुंबांमध्ये साजरा केला जातो; मात्र आज मुस्लिम समाजातील काही बांधवही या सणाला विशेष महत्त्व देत तो उत्साहाने साजरा करीत आहेत. हिंदू-मुस्लिम समाजातील स्नेह आणि बंधुभाव वाढविण्याचे हे एक सुंदर उदाहरण आहे.
गेल्या 17 वर्षांपासून हा कार्यक्रम आयोजित केला जात असून आपण दरवर्षी या कार्यक्रमाला उपस्थित राहतो. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि आपुलकीचे नाते अधिक दृढ करणारा सण आहे. समाजामध्ये प्रेम, बंधुभाव आणि एकोपा वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले.नानजीभाई ठक्कर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, या संस्थेशी त्यांचा गेल्या 17 वर्षांपासून संबंध आहे आणि ते दरवर्षी येथे उपस्थित राहतात. संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून व्यसनमुक्ती आणि समाजप्रबोधनाचे कार्यही केले जाते.अनेक वर्षांपूर्वी स्वामिनारायण स्वामी धनलक्ष्मी चेंबर्स येथे आले होते. त्यावेळी त्यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून, “तुमचे कार्य अतिशय पवित्र आहे. तुम्ही व्यसनमुक्तीचे कार्य करता आणि समाजामध्ये चांगले संस्कार रुजविता,” असे सांगितल्याचे नानजीभाई ठक्कर यांनी नमूद केले.
पूर्वी काही कार्यक्रमांमध्ये महिलांसाठी पडदे ठेवले जात होते. मात्र काळानुसार या प्रथेत बदल करण्यात आला. समाजातील प्रत्येक महिला ही कोणाची तरी आई, बहीण, मुलगी किंवा सून आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान आणि समानतेची भावना समाजामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.या सामाजिक कार्यात हरिप्रसाद स्वामी यांचेही योगदान राहिले आहे. त्यानंतर पुढे प्रमुख स्वामीजी यांच्या मार्गदर्शनामुळे या प्रथांमध्ये सकारात्मक बदल झाले. आता कार्यक्रमांमध्ये पडदे ठेवले जात नाहीत. या बदलाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.रक्षाबंधनाचा सण अत्यंत सुंदर पद्धतीने साजरा करून हिंदू-मुस्लिम समाजातील प्रेम आणि बंधुभाव वाढविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मान्यवरांनी सांगितले. तसेच मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार द्या, जेणेकरून ते भविष्यात चांगले नागरिक बनून समाजासाठी उपयुक्त ठरतील, असे आवाहनही करण्यात आले.यावेळी श्री. सचिनभाई नानजीभाई ठक्कर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांचे आभार मानण्यात आले.