जळगावच्या बायपासवर कार आणि ट्रकची भीषण धडक; एक जण ठार, चार जण जखमी

0

जळगाव । जळगावातील असोदा ते ममुराबाद दरम्यान बायपास मार्गावर कार आणि ट्रकची जोरदार धडक होऊन एक भीषण अपघात घडला आहे. ३१ ऑगस्टच्या रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत कारमधील ५८ वर्षीय शांताराम केशव पाटील यांचा मृत्यू झाला असून, अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

अशी घडली घटना
रावेर तालुक्यातील शिंदखेडा येथील ईश्वर महाजन यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नाशिकला नेण्यात येणार होते. यासाठी रामचंद्र महाजन, शांताराम पाटील, निखील पाटील आणि चालक जितेंद्र रामदास सोपारकर हे ईश्वर महाजन यांच्यासोबत कारने नाशिकच्या दिशेने निघाले होते. जळगाव शहरातील मुख्य मार्गाची वाहतूक टाळण्यासाठी त्यांनी बायपासचा रस्ता निवडला.

मात्र, या मार्गावर सध्या महामार्गाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे एका बाजूचा रस्ता बंद आहे आणि उर्वरित एकाच मार्गावरून दोन्ही दिशांची वाहतूक सुरू आहे. असोदा-ममुराबाद परिसरातून कार जात असताना समोरून पाळधीकडून जळगावच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला.

नागरिकांची मदत आणि रुग्णालयात दाखल
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने सर्वांना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघातात रामचंद्र महाजन (डोक्याला व पायाला दुखापत), निखील पाटील (कपाळाला मार), चालक जितेंद्र सोपारकर (छातीला दुखापत) झाले आहेत. दरम्यान, शांताराम पाटील यांच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आणि त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांत गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघाताचे नेमके कारण आणि ट्रकच्या वेगाबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. महामार्गाच्या दुरुस्तीच्या काळात सुरू असलेल्या एकाच मार्गिकेवरील वाहतुकीमुळे वाहनचालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज या दुर्घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.