गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचं रहस्य अजूनही उलगडलं नाही, उद्धव ठाकरेंच्या शंकेवर गिरीश महाजनांचा पलटवार
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ‘तुमसे ना हो पाएगा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित केली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचे रहस्य अद्याप उलगडले नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार पलटवार केला आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, एखाद्या विषयावरच लक्ष दुसरीकडे वळवायचं असेल तर अशा पद्धतीचे भडक वक्तव्य केले जातात. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल कोणालाही शंका नाहीये. अगदी त्यांच्या कुटुंबातले पंकजाताई असतील किंवा कोणी असेल. कुणालाही शंका नाहीये. पण, असं असतानाही असं मध्येच वाईट स्टेटमेंट करायचं हे मला वाटतं हे योग्य नाही. टीव्हीवर सध्या जे चाललं आहे, त्यावरचं लक्ष विचलित करण्याकरिता मला वाटतं हे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं असावं, असा पलटवार त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय.


उद्धव ठाकरे म्हणाले होते की, प्रमोद महाजन आपलाला उद्याचे पंतप्रधान वाटायचे. एक काळ असा होता की, हा मराठवाडा देशाला पंतप्रधान देऊ शकेल असा नेता त्यांनी तयार केला होता. प्रमोदजी अनपेक्षितपणे आपल्यातून गेले. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंनी भाजपची पाळंमुळं महाराष्ट्रात रुजवली ते आज दोघेही राहिले नाहीत. गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचं रहस्य अजूनही उलगडलं नाही. मला वाईट काय वाटतं, जो भाजपची पाळंमूळं घेऊन लढला, तो सत्तेचा उपभोग घेऊ शकला नाही. सत्ता घेऊन तो मराठवाडा आणि देशाला काही देऊ शकला नाही हे शल्य माझ्या मनात आहे. गोपीनाथ मुंडेंबद्दल मला एवढं वाईट वाटतं की, एक दिवससुद्धा ते मंत्री म्हणून लोकसभेच्या सभागृहात जाऊ शकले नाहीत. काल रात्री बोलतात काय, आज सकाळी बातमी काय येते, रहस्यमय मृत्यू… असे म्हणत त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली होती.