खडसेंच्या अमृत महोत्सवाला महायुती गैरहजर; महाजन म्हणाले, ‘मी एवढा मोठा माणूस नाही’

0

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला महायुतीतील प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे यांच्यासह अनेक नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे महायुतीतील नेत्यांची उपस्थिती राहिली नाही.

मुक्ताईनगर येथे झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि प्रतापराव जाधव यांची उपस्थिती होती. मात्र, महायुतीतील इतर प्रमुख नेते आणि अनेक आमदारांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून खडसेंना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे या कार्यक्रमातील राजकीय उपस्थितीची जळगावच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे, एकनाथ खडसे यांचे अनेक वर्षांचे राजकीय सहकारी असलेले मंत्री गिरीश महाजन हेही कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. महाजन यांच्या अनुपस्थितीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे पुन्हा एकदा खडसे-महाजन यांच्यातील राजकीय दुरावा चर्चेत आला.

‘एकनाथ खडसे यांना शुभेच्छा देण्याइतका मी मोठा माणूस नाही,’ असे म्हणत गिरीश महाजन यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकात महाजन यांचा फोटो असल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. पुस्तकात आपला फोटो असल्यास त्यामागे कौटुंबिक संबंध कारणीभूत असतील, असे म्हणत महाजन यांनी त्यावरही मिश्कील टिप्पणी केली.

रक्षा खडसेंच्या वक्तव्यावरही महाजनांचा टोला

अमृत महोत्सवी सोहळ्यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांचे तसेच उपस्थित न राहिलेल्यांचेही आभार मानले होते. त्यांच्या या वक्तव्यावरही गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. ‘रक्षा खडसे यांचेही आभार,’ असे म्हणत महाजन यांनी पुन्हा उपरोधिक शैलीत भाष्य केले.

एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात महाविकास आघाडीतील नेत्यांची लक्षणीय उपस्थिती आणि महायुतीतील प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवली. त्यातच गिरीश महाजन यांच्या खोचक वक्तव्यामुळे खडसे-महाजन यांच्यातील राजकीय संघर्षाला पुन्हा चर्चेचे कारण मिळाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.