बिलाखेड अपघात प्रकरणात भाजप सरचिटणीसावर गुन्हा दाखल
चाळीसगाव : चाळीसगाव-मालेगाव मार्गावरील बिलाखेड गावाजवळ चार महिलांना भरधाव कारने धडक दिल्याच्या प्रकरणात अखेर भाजपचे सरचिटणीस जितेंद्र रविंद्र पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भीषण अपघातात सुशीलाबाई गुलचंद जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर संगीता पोपट कोळी, सुनीता संजय वंजारी आणि विठाबाई युवराज हाडपे या तिघी गंभीर जखमी झाल्या आहेत.
मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बिलाखेड गावाजवळील हनुमान मंदिर परिसरात हा अपघात झाला. काही महिला रस्ता ओलांडत असताना चाळीसगावकडून मालेगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातानंतर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. याचवेळी कारचालकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
अपघातानंतर ग्रामस्थांचा संताप
या घटनेनंतर सुरुवातीला केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला. अपघात गंभीर असतानाही संबंधित चालकाविरोधात तत्काळ गुन्हा दाखल का करण्यात आला नाही, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. राजकीय व्यक्ती असल्यामुळे पोलिसांवर दबाव असल्याची चर्चाही परिसरात सुरू झाली.
चालकावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रात्रीच रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर बुधवारी दुपारीही ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलन केले. त्यामुळे पोलिस प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढला.
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली. पोलिसांनी आंदोलक ग्रामस्थांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.अपघातातील सुशीलाबाई गुलचंद जाधव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य तीन महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघाताची भीषणता सांगताना ग्रामस्थांनी दावा केला की, कारची धडक एवढी जोरदार होती की एका महिलेला कारच्या समोरील काचेचा भाग फोडून चालकाच्या बाजूच्या आतील भागात फेकले गेले.
आंदोलनानंतर अखेर गुन्हा दाखल
ग्रामस्थांचा वाढता संताप आणि रास्ता रोको आंदोलनानंतर अखेर मृत महिलेच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून जितेंद्र रविंद्र पाटील यांच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस करत असून, अपघाताच्या वेळी वाहनाचा वेग, चालकाची अवस्था आणि अपघाताची नेमकी परिस्थिती याबाबत तपास केला जात आहे.