महिलाच कुटुंबाचा अन् देशाचा कणा : नानजीभाई ठक्कर

0

महिला दिनानिमित्त वुमन्स अँड चाइल्ड केअर प्लसचा विशेष कार्यक्रम : गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, समाजसेविकांचा सत्कार

जळगाव : जागतिक महिला दिनाच्या औचित्याने वुमन्स अँड चाइल्ड केअर प्लस या संस्थेतर्फे विशेष महिला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला ठाण्याचे दानशूर व्यक्तिमत्व तथा धनलक्ष्मीबाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नानजीभाई ठक्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी जळगावच्या महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सिंधुताई कोल्हे, बाफना संस्थेच्या नयनतारा बाफना, लोकशाही समूहाच्या शांताबाई जळगाव, जनता सहकारी बँकेच्या संचालिका डॉ. आरती हुजुरबाजार, डॉ. कल्याणी नागोरकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण तसेच नगरसेविका जयश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात गरीब व गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच कचरा वेचणाऱ्या लहान मुला-मुलींना शिक्षण देणाऱ्या समाजसेविकांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमात लहान मुलींसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत विजयी ठरलेल्या मुलींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. चिमुकल्यांनी सादर केलेल्या आकर्षक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

वुमन्स अँड चाइल्ड केअर प्लस संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदाही महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने महिला दिनानिमित्त हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा शांता वाणी यांनी केले. यावेळी शाळाबाह्य मुलांसाठी व वंचित समाजासाठी कार्य करणाऱ्या प्रणिती सिसोदिया, वैशाली झाल्टे, सुष्मिता पाटील आणि वंदना पवार या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याची ओळख शालिनी पाटील यांनी उपस्थितांना करून दिली.
महापौर दीपमाला काळे यांनी आपल्या भाषणात जळगाव शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील तसेच शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. जनता सहकारी बँकेच्या संचालिका डॉ. आरती हुजुरबाजार यांनी महिलांना आरोग्य, आहार, विहार आणि कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात नानजीभाई खिमजीभाई ठक्कर यांनी महिलाच कुटुंबाचा तसेच देशाचा कणा असल्याचे सांगितले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण देशभर काम करत असून गरजू महिलांना शिवण मशीनसारखे कुटुंबाला हातभार लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच येथील कार्यालयाचे काम कमलाकर वाणी पाहत असून त्यांच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर महिलांसाठी आवश्यक मदत केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.सत्कारार्थी महिलांनीही आपल्या कामाचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालिनी चौधरी यांनी केले, तर समाधान पवार यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सचिव छाया पाटील, उपाध्यक्ष रुपाली पवार, हेमलता कुलकर्णी, अनिता बडगुजर, समता भावसार, तनुजा चोपडे, पूजा पंडित, अर्चना पाटे, ज्योती दातेराव, साक्षी सूर्यवंशी, निवेदिता ताठे, वंदना गडे, कामिनी पांडे आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.