परळचे सुपुत्र श्री राजू देसाई यांनी इतिहास केला जिवंत

0

राजमाता जिजाऊ आणि स्वराज्यातील अनेक स्त्रियांच्या दूरदृष्टीचा केला गौरव

मुंबई | स्वराज्य केवळ तलवारीच्या जोरावर उभे राहिले नाही, तर त्यामागे राजमाता जिजाऊ आणि स्वराज्यातील अनेक स्त्रियांची दूरदृष्टी, प्रेरणा आणि अजेय मानसिकता कारणीभूत होती”, अशा परखड शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त श्री राजू देसाई यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात स्त्रियांचे स्थान, मानसिकता आणि कर्तृत्व या विषयावर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉट कॉम्प्युटर, परळ, कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) परळ-लालबाग शाखा आणि महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, 9 मार्च 2026 रोजी विशेष व्याख्यान व संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. राजू देसाई यांचे कार्य थक्क करणारे व आजच्या पिढी पर्यंत महाराजांचा इतिहास पोहोचविण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया येथे व्यक्त करण्यात आली.
व्याख्याते राजू देसाई यांनी आपल्या ओघवत्या वाणीने स्वराज्याच्या निर्मितीमागील स्त्री-शक्तीचा इतिहास उलगडला. “स्वराज्य केवळ तलवारीच्या जोरावर उभे राहिले नाही, तर त्यामागे राजमाता जिजाऊ आणि स्वराज्यातील अनेक स्त्रियांची दूरदृष्टी, प्रेरणा आणि अजेय मानसिकता कारणीभूत होती”, असे मत त्यांनी ठामपणे मांडले. इतिहासातील अनेक रोमांचकारी आणि अंगावर काटा आणणाऱ्या प्रसंगांचे वर्णन करीत त्यांनी आजच्या महिलांनाही स्वकर्तृत्वाने पुढे वाटचाल करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी उपस्थित सर्व महिला आणि विद्यार्थिनींना ‘स्त्री प्रेरणा प्रतिज्ञा’ देण्यात आली. यावेळी व्याख्याते श्री. राजू देसाई यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाबद्दल त्यांचा सन्मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी ‘बॅनरांजली’ हे विकास वराडकर लिखित लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने सन्मानित असलेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील पुस्तक त्यांना भेट म्हणून देण्यात आले.

यावेळी आवर्जून उपस्थित राहिलेल्या कोमसाप, मुंबई जिल्हा अध्यक्षा, विद्या प्रभू यांनी “राजू देसाई यांनी मांडलेले विचार अत्यंत प्रभावी आहेत. अशी व्याख्याने शाळा आणि महाविद्यालयांमधून मोठ्या प्रमाणावर होणे काळाची गरज आहे. असे आवर्जून सांगितले”
आपले मत मांडताना परळ-लालबाग शाखेच्या कार्याध्यक्षा, सोनाली कदम यांनी “इतिहासातील अनेक दुर्लक्षित संदर्भ आज देसाई यांच्या व्याख्यानामुळे समजले, ही आम्हा सर्वांसाठी समाधानाची बाब आहे” असे म्हणत उपस्थित विद्यार्थिनींना या व्याख्यानातून प्रेरणा घेऊन आयुष्यात यशस्वी होण्याचे स्वप्न बघा असे आवर्जून सांगितले…

या कार्यक्रमाला विद्यार्थी क्रीडा केंद्राचे अध्यक्ष गजानन वाईरकर हे कौतुक करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते..यावेळी महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त वाईरकर कुटुंब, डॉट कॉम्प्युटरचे प्रमोद वराडकर, महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या शिक्षिका प्रियंका आणि नर्सिंगच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी ग्राफिक डिझाइन कोर्सचे विद्यार्थी तृप्ती कालेकर, श्रावणी, पूजा, साहिल, शुभम, दुर्गेश आणि कोमसापचे पदाधिकारी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉट कॉम्प्युटरच्या सोनाली जंगम, संध्या घोरपडे, वैष्णवी घाडीगांवकर आणि अश्विनी सपकाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कोमसाप परळ-लालबाग शाखेचे अध्यक्ष श्री. विकास वराडकर यांनी केले व शेवटी सहकार्यासाठी व हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मनापासून आभार मानले. शिवभक्त राजू देसाई यांचे कार्य थक्क करणारे व आजच्या पिढी पर्यंत महाराजांचा इतिहास पोहोचविण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया येथे व्यक्त करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.