नागरिकांना जबाबदारीची जाणीव करुन देण्याची गरज – अश्विन वैद्य
जळगाव | “स्वच्छता, शिस्त, सत्य, अहिंसा आणि कायदा-सुव्यवस्था हे महात्मा गांधीजींचे मूलभूत विचार आपण विसरत चाललो आहोत. पुढील १५ ते २० दिवस तुम्ही गावोगावी जाणार आहात. तेथे प्रदर्शनी, संवाद, खेळ, प्रश्नमंजुषा आदी माध्यमांतून नागरिकांना एक सजग नागरिक म्हणून जबाबदारीची जाणीव करुन देणे अत्यंत गरजेचे आहे. हे विचार आत्मसात करून, या जबाबदारीचा काही लोकांनी अंगीकार केला तरी सायकल यात्रेचे उद्दीष्ट सफल होईल,” असे प्रतिपादन लेफ्ट. कर्नल अश्विन वैद्य यांनी केले.
सकाळी ठीक सात वाजता गांधी तीर्थ येथील अॅम्फी थिएटरमध्ये राष्ट्रपिता गांधीजींच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पार्पण करून अभिवादन केले. पाहुण्यांसह उपस्थितांनी सर्वधर्म प्रार्थना म्हटली. कार्यक्रमात अशोक जैन यांनी चांगल्या नागरीकत्वासाठी सर्वांना सत्य, अहिंसेची शपथ दिली. ज्यामुळे समाजातील जबाबदार नागरिकत्वाची जाणीव अधिक दृढ झाली. उत्साह, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम यावेळी दिसून आला.


महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त (हुतात्मा दिनी) गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित ‘ग्रामसंवाद सायकल यात्रा’ गांधी तीर्थ येथून सुरू झाली. या यात्रेला एनसीसीचे कमांडींग ऑफिसर लेफ्ट. कर्नल अश्विन वैद्य, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन आणि ज्येष्ठ गांधीयन तसेच लेखक बरून मित्रा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती होती.ही ग्रामसंवाद सायकल यात्रा यावर्षी महाराष्ट्र व गुजरात राज्यांतील ५ जिल्ह्यांमधील १० तालुक्यांतील ८० गावांना भेट देणार असून सुमारे ४०० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. यात्रेच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थी, युवक, महिला व नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे. या उपक्रमात भारतातील विविध राज्यांतील व स्थानिक असे ३५ स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.यात्रेदरम्यान शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शनी, मूल्यसंवर्धनाचे खेळ, प्रश्नमंजुषा व कठपुतली खेळांच्या माध्यमातून चारित्र्यनिर्मितीचे कार्य केले जाणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी पथनाट्याद्वारे सामाजिक सद्भाव विषयावर प्रबोधन होणार असून दररोज शाळा-महाविद्यालयात दोन कार्यक्रम व रात्री जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
भारतीय स्वातंत्र्यावरील विशेष प्रदर्शनीही कार्यक्रमस्थळी मांडण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मिश्रा यांनी केले.कार्यक्रमास ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन, यात्रा समन्वयक गिरीश कुळकर्णी, डॉ. अश्विन झाला, प्रशांत सुर्यवंशी, सुधीर पाटील, विश्वजित पाटील, विक्रम अस्वार, चंद्रकांत चौधरी, मयूर गिरासे सायकल यात्री व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी उपस्थित होते. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात यात्रा औपचारिक उद्घाटनानंतर ही सायकल यात्रा जैन हिल्स येथून पुढे मार्गस्थ झाली.