धुळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार; माजी आमदार राष्ट्रवादीच घड्याळ हातात बांधणार

0

धुळे । धुळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा खिंडार पडणार आहे. कारण आज जळगाव जिल्ह्यातील पाच माजी आमदारांसोबतच धुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत शनिवारी (३ मे) मुंबईत राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतील. त्याच वेळी नंदुरबार जिल्ह्यातील जि.प., पं.स.चे काही माजी सदस्यही अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.

धुळे ग्रामीण (कुसुंबा) मतदारसंघातून प्रा. पाटील २००९ मध्ये तत्कालिन मंत्री रोहिदास पाटील यांचा पराभव करून विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी धुळे शहर मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाही. त्यामुळे ते स्वगृही काँग्रेस पक्षात परतले होते. पण तिथेही भ्रमनिरास झाल्याने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. आता त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. धुळे येथे कृषिविद्यापीठ व्हावे, या आपल्या मागणीला अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे प्रा. पाटील यांनी सांगितले

जळगाव जिल्ह्यातील यांचा होईल प्रवेश
जळगाव जिल्ह्यातील पाच माजी आमदार मुंबईत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यात गुलाबराव देवकर (जळगाव ग्रामीण), डॉ. सतीष पाटील (पारोळा), दिलीप वाघ (पाचोरा), कैलास पाटील (चोपडा) आणि दिलीप सोनवणे (विधान परिषद) यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काही कार्यकर्तेही त्यांच्यासमवेत असतील.

Leave A Reply

Your email address will not be published.