अवैध शस्त्र बाळगणाऱ्या 98 आरोपींकडून 100 पिस्तूल जप्त ; जळगाव पोलिसांची कारवाई
जळगाव । जळगाव जिल्ह्यातील पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यात एक महत्त्वपूर्ण कारवाई करत अवैध शस्त्र ठेवणाऱ्या व विक्री करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 100 पिस्तूल व रिवाॅल्वर जप्त करण्यात आले आहेत, तर 98 आरोपींकडून 25 लाख 98 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
अवैध शस्त्र विक्रीचा मोठा खेळ
जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्र खरेदी-विक्री होत असल्याचे पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईवरून दिसून येत आहे. जळगाव जिल्हा सातपुडा पर्वत तसेच मध्य प्रदेशाला लागून आहे, यामुळे अवैध शस्त्र विक्री करणाऱ्यांना या मार्गाने खुला मार्ग मिळतो. मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या बॉर्डर असलेल्या लहान उमर्टी व मोठ्या उमर्टी या ठिकाणी अवैध शस्त्र निर्माण करण्याचे काम होते. याच ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील चोपडा मार्गे, यावल मार्गे अशा विविध मार्गाने अवैध शस्त्रांची आवकजावक होत असते.
गेल्या 11 महिन्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एकूण 63 केसेस नोंदविण्यात आलेले आहेत. या कारवाईमध्ये शंभर पिस्तूल व रिवाॅल्वर असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 166 काडतूस असे एकूण 25 लाख 98 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. 1 जानेवारी 2024 ते 31 नोव्हेंबर 2024 या कालावधीत 98 आरोपींकडून हा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेण्यात आला आहे.
जळगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध शस्त्र विक्री व्यवसायावर महत्त्वपूर्ण आघात झाला आहे. पोलीस प्रशासनाने या कारवाईद्वारे समाजात सुरक्षितता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणातील आरोपींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.