नंदुरबारमध्ये मक्याला मिळतोय चांगला भाव, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

0

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड करण्यात आलेली होती. पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्याला उत्पादन देखील चांगले झाले आहे. आता मक्याची काढणी केल्यानंतर बाजार समितीत विक्रीसाठी आणला जात आहे. यामुळे नंदुरबारच्या बाजार समितीत देखील मक्याची आवक वाढली आहे. आवक वाढण्यासोबत मक्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील काही दिवसांपासून मक्याची आवक वाढली असून दररोज अडीचशे ते तीनशे वाहनातून तीन ते चार हजार क्विंटल मका बाजार समितीत विक्रीसाठी दाखल होत आहे.

साडेतीन हजारापर्यंत दर
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत ७० हजार क्विंटल मक्याची खरेदी झालेली आहे. मक्याचे दर वाढल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात मका बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहे. यावर्षी झालेला चांगला पाऊस यामुळे जिल्ह्यात मक्याच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. तर नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मक्याला २ हजार ते २ हजार ३०० रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. तर सफेद मक्याला २ हजार ४०० पासून ३ हजार ४५० पर्यंतचा दर मिळत आहे.

दरात आणखी वाढ होण्याची शक्यता
जिल्हाभरातून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मका विक्रीसाठी दाखल होत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे. अजून येणाऱ्या काळात मक्याचे दर वाढतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मका खरेदी सुरू असून परिसरात चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीला पसंती दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.