अजित पवारांच्या बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

0

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगच्या अधिकाऱ्यांकडून नेते मंडळींच्या बॅगांची तपासणी केली जात असल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरचीही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगेत सापडलेल्या गोष्टींने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे

अजित पवारांनी आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर आणि त्यामधील बँगांची तपासणी केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ हेलिकॉप्टरमधून शूट करण्यात आला आहे. हेलिकॉप्टरबाहेर उभे असलेले अधिकारी सीटवर ठेवलेली अजित पवारांची बॅग तपासताना दिसत आहेत. अधिकारी बॅगमधील सामान तपासत असताना अजित पवार समोरच्या सीटवर बसले असून मोबाईलवर बोलताना दिसत आहेत. एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हाताने बॅग उघडून देत कर्मचाऱ्यांना बॅगमध्ये काय आहे हे दाखवत असल्याचं दिसत आहे. अजित पवारांनी आपल्याकडील लॅपटॉप बॅगही अधिकाऱ्यांना तपासण्यासाठी दिली. तसेच त्यानंतर त्यांनी थंड पाण्याच्या बाटल्या ठेवण्यासाठीचा बॉक्सही अधिकाऱ्यांना उघडून दाखवला. या व्हिडीओमध्ये जॅकेट कव्हरमध्ये असलेलं अजित पवारांचं जॅकेटही सीटवर दिसत आहे.


हा व्हिडीओ शेअर करताना अजित पवारांनी, “मी आज निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना निवडणूक आयोगाने माझ्या हेलिकॉप्टरची आणि हेलिकॉप्टरमधील बँगांची तपासणी केली. मी यावेळी त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. मुक्त आणि पारदर्शक निवडणुकीसाठी अशाप्रकारच्या अत्यावश्यक गोष्टी गरजेच्या असल्याचं माझं मत आहे. आपण सर्वांनी कायद्याचा आदर केला पाहिजे. या माध्यमातून आपण आपल्या लोकशाहीच्या मूल्यांची जोपासणा केली पाहिजे,” असं म्हटलं आहे. ही पोस्ट करताना अजित पवारांनी महाराष्ट्र निवडणूक 2024 अशा अर्थाचा हॅशटॅगही वापरला आहे.

<strong>अजित पवारांच्या बॅगमध्ये काय सापडलं?</strong>
अजित पवारांच्या बॅगमधून चकलीचं पाकिटाबरोबरच खाद्य पदार्थांची काही पाकिटं, डबा आणि इतर गोष्टी अधिकाऱ्यांनी बाहेर काढल्याचं दिसत आहे. अजित पवारांनी डबा उघडून तपासण्यास सांगितला असता अधिकाऱ्यांना या डब्यामध्ये लाडू असल्याचं दिसलं. तुम्हीच पाहा अजित पवारांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ…

Leave A Reply

Your email address will not be published.