ताप, रक्तदाब, मधुमेहावरील ५३ औषधांची गुणवत्ता खराब
नवी दिल्ली । भारतीय औषध नियामक सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरलेल्या औषधांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये तापामध्ये सामान्यतः सेवन केल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉलच्या गोळ्या गुणवत्तेच्या चाचणीत नापास झाल्या आहेत. याशिवाय कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी-3 सप्लिमेंट्स, मधुमेहाच्या गोळ्या आणि उच्च रक्तदाबाच्या औषधांसह 50 हून अधिक औषधे औषध नियामकाने केलेल्या गुणवत्तेच्या चाचणीत अपयशी ठरल्याचे आढळून आले आहे.
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन दर महिन्याला चाचणीसाठी काही औषधे निवडते. त्यानंतर त्यांची तपासणी केली जाते. या वेळी सरकारी संस्थेने व्हिटॅमिन सी आणि डी 3 गोळ्या शेलकल, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सॉफ्टजेल, अँटासिड पॅन-डी, पॅरासिटामॉल आयपी 500 मिलीग्राम, मधुमेहावरील औषध ग्लिमेपिराइड, उच्च रक्तदाब औषध टेलमिसार्टन यासारख्या औषधांची चाचणी केली होती, जे गुणवत्ता चाचणीत नापास झाले. आधी ऑगस्टमध्ये सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने एकापेक्षा जास्त कॉम्बिनेशन असलेल्या 156 फिक्स्ड डोस ड्रग्स (FDCs) वर बंदी घातली होती.
जी औषधे क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाली त्याची निर्मिती हेटेरो ड्रग्ज, अल्केम लॅबरेटरीज, हिंदुस्तान एटीबायोटिक्स लिमिटेड, कर्नाटक एटीबायोटिक्स अॅण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड, प्योर अॅण्ड क्योर हेल्थकेअर आणि मेग लाइफसायन्सेस या कंपन्यांकडून केली जात आहे. पीएसयू हिंदुस्तान एटीबायोटिक्स लिमिटेडद्वारे तयार केली जाणारी मेट्रोनिडाजोल देखील क्वालिटी टेस्टमध्ये फेल झाली आहे. हे औधष पोट खराब झाल्यावर घेतले जाते.
CDSCOने ५३ औषधांची गुणवत्ता चेक केली होती. ज्यातील ४८ औषधे त्याच्या मानकांवर खरी उतरली नाहीत. अन्य ५ औषधांना या यादीतून हटवण्यात आले आहे. कारण ही औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांनी दावा केला होता की बाजारात त्यांच्या नावाने बनावट औषधे विकली जात आहेत. कंपन्यांनी असे देखील म्हटले आहे की, या विकल्या जाणाऱ्या औषधांची निर्मिती त्यांनी केलेली नाही.