एकाच कुटुंबांतील चौघांच्या आत्महत्येने धुळे हादरले!
धुळे । धुळे शहरामधून एक खळबळजनक घटना समोर आलीय. येथील देवपूर परिसरात असणाऱ्या प्रमोद नगरात एका बंद घरात पती-पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. यातील मयत व्यक्तीने गळफास घेतला असून त्याची पत्नी आणि दोघा मुलांचे मृतदेह जमिनीवर आढळून आले आहेत. परिसरातील नागरिकांनी घरातून दुर्गंधी येत असल्याने मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना माहिती दिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
देवपूरमधील प्रमोद नगरमध्ये प्लॉट नं.8 येथे राहणार्या एका कृषि खत विक्रेत्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आज बंद घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एकाच वेळी चार मृतदेह घरातून मिळून आल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. प्रमोदनगरमध्ये राहणारे प्रविण मानसिंग गिरासे (वय 52), त्यांची पत्नी दिपा प्रविण गिरासे (वय 44) व मुले चि. मितेश गिरासे ( वय 13 ) आणि चि. सोहम गिरासे( वय 18 ) अशा चार जणांचे मृतदेह आज सकाळी त्यांच्या बंद घरात मिळून आले. साधारण तीन ते चार दिवसापूर्वी ही घटना घडली असावी. असा अंदाज आहे.
गेल्या चार दिवसापासून गिरासे यांचे घर बंद होते. घरकामासाठी येणारी महिलाही गिरासे कुटुंब गावाला गेले असावे म्हणून ती दोन वेळा परत गेली. गॅस सिलेंडर देणारा देखील घर बंद असल्याने परत गेला होता. घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. गिरासे यांचा घर बंद असल्यामुळे परिसरातील नागरिकांना संशय आला. त्यामुळे त्यांनी मयत गिरासे परिवाराच्या नातेवाईकांना संपर्क करून ही माहिती दिली. मयत प्रविण गिरासे यांची बहीण संगिता योगेंद्रसिंग राजपूत यांना माहिती मिळाल्याने त्यांनी तातडीने प्रविणचे घर गाठले. लोकांच्या मदतीने दरवाजा उघडला असता घरातील एका रुममध्ये प्रविणचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत होता. तर पत्नी व मुलांचे मृतदेह जमिनीवर पडलेले आढळून आले. हे दृष्य पाहून संगिता यांनी एकच हंबरडा फोडला.