कोरपगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र त्वरित चालू करावे ; भाजपाचे तहसीलदारांना निवेदन
इगतपुरी :
इगतपुरी तालुक्यातील कोरपगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची वास्तू बांधून सलग आठ ते दहा वर्षे झालेले आहेत. ते प्राथमिक आरोग्य केंद्र त्वरीत सुरु करावे या मागणीचे निवेदन भाजपाचे तालुकाध्यक्ष रवि गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अभिजीत बारावकर यांना देण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्याचा शासनाचा प्राथमिक हेतू गोरगरीब दुर्बळ जनता यांना जागेवर प्रथम उपचार मिळावा, तसेच ग्रामीण भागातील डोंगराळ वस्तीमुळे स्वांद दंश,सर्पदंश आणि गरोदर महिलांच्या बाळंतपण होण्यासाठी ही वास्तू बांधण्यात आली होती. ग्रामीण भागातील एकही महिला माता भगिनी मृत्युमुखी किंवा बालमृत्यू असे कोणतेही प्रकार होऊ नये यासाठी आम्ही स्वतः वारंवार एक ते दोन वर्षापासून निवेदनाद्वारे, तोंडी मुलाखत घेऊन या विषयाचा पाठपुरावा केलेला आहे. सदर भागांमध्ये एखादी साथ उद्भवली या साथीमुळे गोरगरीब जनतेचा मृत्यू झाल्यास याला जबाबदार कोण? महोदय इगतपुरी तालुका हा गोरगरीब आदिवासी लोकांचा तालुका असून त्यांना त्यांच्या सुख सुविधा योग्य वेळेवर मिळणे ही आपली जबाबदारी आहे, त्यामुळे येत्या आठ ते दहा दिवसात कोरपगाव प्राथमिक आरोग्य केंद्र चालू करून जनतेला त्यांच्या सेवेचा लाभ घेता यावा याची तरतूद करावी. येत्या आठ ते दहा दिवसात कोरपगाव प्राथमिक आरोग्य केंद्र चालू न झाल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंचायत समिती इगतपुरी येथे कुलूप लावण्यात येईल, व मोठे आंदोलन उभे करण्यात येईल याला सर्वस्वी आपण जबाबदार राहाल असा इशारा या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. या प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष रवि गव्हाणे, ॲड. कार्तिक आडोळे, ॲड. सुशील गायकर, सरपंच गणेश गोडे, श्रीकांत चव्हाण, पिंटू जोशी, दीपक गव्हाणे आदी उपस्थित होते.