बदलापूर अत्याचार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. या शाळेच्या संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही दिले आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशीही चर्चा केली.
बदलापूर पूर्वेतील नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली. यां सारख्या घटना घडू नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाय योजण्यास सांगितले आहे. विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील, त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
‘शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क असतो, त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि त्याचा ट्रॅक ठेवणे, त्यांची पार्श्वभूमी माहिती करून घेणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले.
‘विद्यार्थिनींना थोडा जरा संशय आल्यास त्यांना तातडीने प्राचार्य, मुख्याध्यापक, किंवा शिक्षकांना न घाबरता निदर्शनास आणून देता आलं पाहिजे, अशी यंत्रणा हवी असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सर्व शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांशी संस्थाचालकांनी त्वरित बोलून योग्य ती काळजी घ्यावी. या प्रकरणात संस्थाचालकांची चूक असेल तर प्रसंगी त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वे आंदोलकांना शांततेचे आवाहन केले.