राज्यातील विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार; आज निवडणूक आयोग तारखा जाहीर करणार
निवडणूक आयोग आज विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
आज फक्त जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात आणि उर्वरित महाराष्ट्र आणि झारखंडच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील, असे सांगण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे.
दरम्यान, हरियाणा विधानसभेची मुदत 3 नोव्हेंबर 2024 रोजी संपणार आहे. तर महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपणार आहे. सध्या ऑगस्ट महिना सुरु आहे. त्यामुळे तीन महिन्यापूर्वीच आचार संहिता लावण्याची शक्यता तशी कमीच असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
आज महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होणार नाही अशी चर्चाही रंगली आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 28 नोव्हेंबर पर्यंत आहे. दिवाळी 1 ते 3 नोव्हेंबर च्या दरम्यान आहे. त्यामुळे कदाचित दिवाळीनंतर महाराष्ट्रात मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता राज्यातील निवडणुकांची घोषणा होण्याची त्यामुळेच शक्यता नसल्याचे राजकीय विश्लेषकांचा व्होरा आहे. अर्थात दुपारी 3 वाजता निवडणूक आयोग काय घोषणा करते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.