संभाजीराजे छत्रपतींसह ६० जणांविरोधात गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

0

कोल्हापूर । कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहे. त्यांनी रविवारी ‘चलो विशाळगडचा नारा’ दिला होता. शिवभक्तांसह ते विशाळगडावर गेले होते. अज्ञातांनी विशाळगडच्या पायथ्याला असणाऱ्या काही गावांमध्ये धुडगूस घातला. यावेळी काही अज्ञातांनी स्थानिकांवर हल्ला केला होता. त्यांच्यावर दगडफेक केली, घरांची तोडफोड केली तसंच वाहनांची देखील तोडफोड केली होती. या दगडफेकीमध्ये अनेक गावकरी जखमी झाले होते. यामुळे या अतिक्रमण मोहिमेला हिंसक वळण आले होते. याचे धक्कादायक व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते.

यातच आता बेकायदेशीर जमाव जमवणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे याप्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेगवेगळ्या १० पेक्षा अधिक कलमांतर्गत शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आतापर्यंत पोलिसांनी २१ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये कोल्हापूरसह इचलकरंजीतील अनेक जणांचा समावेश आहे. अजूनही काहींना ताब्यात घेण्यात येणार अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.